कष्टकरी स्त्रीच्या संघर्षांचा आणि यशाचा पट उभा करणाऱ्या ‘सोंगटी’ या कादंबरीवर आधारित डॉ. वीणा सानेकर यांनी सादर केलेला एकपात्री प्रयोग सोमवारी मुंबई विद्यापीठात चांगलाच रंगला. कालिना येथील विद्यापीठ संकुलातील फिरोजशहा मेहता भवन सभागृहात ९ एप्रिलपासून सुरू असणाऱ्या ‘महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सप्ताहा’त सोमवारी या एकपात्री प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. विजया वाड यांनी १९९९ साली लिहिलेल्या ‘सोंगटी’ या कादंबरीमध्ये ‘सोंगटी हिरामन शिंदे’ या घरकाम करणाऱ्या स्त्रीच्या जीवनात शिक्षणामुळे कसे बदल होतात याचे चित्रण करण्यात आले आहे. मोलकरणीचे काम करण्यापासून ते शिक्षणमंत्री होण्यापर्यंतचा सोंगटीचा प्रवास कादंबरीतून आपल्यासमोर येतो. शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या कादंबरीवर आधारित एकपात्री प्रयोगातून डॉ. वीणा सानेकर यांनी सोंगटीचा हा प्रवास मूर्त रूपात प्रेक्षकांसमोर उभा केला. सोंगटीला केंद्रस्थानी ठेवत कादंबरीतील विविध व्यक्तिरेखांचा परस्परांशी होणाऱ्या संवादाचे, प्रसंगांचे नाटय़मय सादरीकरण डॉ. सानेकर यांनी या वेळी केले.
स्त्रियांवरील अन्यायाचे, त्यांच्या प्रश्नांचे विविध संदर्भ आणि फुले-आंबेडकरी विचारांशी जोडले गेलेले नाटय़मय कथन तसेच संवादातील लय, सोंगटीच्या बोली भाषेच्या वापरामुळे रंगलेल्या या प्रयोगाला उपस्थितांनीही दाद दिली.
या वेळी कादंबरीच्या लेखिका डॉ. विजया वाड यांच्यासह डॉ. अशोक येंडे, डॉ. मनाली लोंढे, डॉ. वैदही दफ्तरदार आदी मान्यवर तसेच विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.