मुंबई : सध्या मुंबई विद्यापीठाची तृतीय वर्ष विधि शाखेची सहाव्या सत्राची परीक्षा सुरू आहे. मात्र ऐनवेळी प्रिंटरमध्ये बिघाड झाल्यामुळे मुंबईतील न्यू लॉ महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांना ‘महिला व बाल न्याय हक्क कायदा’ या विषयाची प्रश्नपत्रिका तब्बल एक तास उशिरा मिळाल्याचा प्रकार बुधवारी घडला.

मुंबई विद्यापीठातर्फे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ उन्हाळी सत्राअंतर्गत तृतीय वर्ष विधी शाखेची (तीन वर्षीय अभ्यासक्रम) सहाव्या सत्राची परीक्षा २५ एप्रिल ते १८ मे या कालावधीत घेण्यात येत आहे. सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० अशी परीक्षेची वेळ आहे. ‘महिला व बाल न्याय हक्क कायदा’ या विषयाच्या परीक्षेसाठी विद्यार्थी माहिममधील न्यू लॉ महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर बुधवार, १५ मे रोजी सकाळी १० वाजताच हजर झाले. परंतु महाविद्यालयातील प्रिंटरमध्ये बिघाड झाल्याने प्रश्नपत्रिका १० वाजून ४५ मिनिटांनी म्हणजेच १५ मिनिटे उशिरा देण्यात येईल, असे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. मात्र अर्धा तास उलटला तरीही हाती प्रश्नपत्रिका न आल्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. एका प्रिंटरवरून सर्व प्रश्नपत्रिका छापण्यास विलंब झाल्यामुळे विद्यार्थ्यांना तब्बल एक तास उशिरा प्रश्नपत्रिका देण्यात आली.

हेही वाचा – मुंबई विद्यापीठात मंदिर व्यवस्थापनाचे अभ्यासक्रम, जून महिन्यापासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

दरम्यान, ‘एका प्रिंटरमध्ये ऐनवेळी बिघाड झाल्यामुळे प्रश्नपत्रिकेच्या प्रती काढण्यास विलंब झाला. पण आम्ही विद्यार्थ्यांना २० मिनिटांनंतर प्रश्नपत्रिका दिली आणि परीक्षेसाठी दीड वाजेपर्यंत अतिरिक्त वेळही दिला. परीक्षा ही सुरळीतपणे पार पडली’, असे न्यू लॉ महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. शिवानी शेलार यांनी सांगितले

‘विद्यार्थ्यांना ११ वाजून २० मिनिटांनी प्रश्नपत्रिका देण्यात आली. अनेक विद्यार्थी नोकरी सांभाळून शिक्षण घेणारे होते, त्यामुळे त्यांचा खोळंबा झाला’, असे एका विद्यार्थ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले. तर मुंबई विद्यापीठ प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी आणि संबंधित महाविद्यालयावर कारवाई करावी, अशी मागणी ठाकरे गटाच्या युवा सेनेचे सहसचिव ॲड. संतोष धोत्रे यांनी केली.

हेही वाचा – तत्कालीन लोहमार्ग पोलीस आयुक्तांची चौकशी होणार ? रेल्वे पोलीस विभागाचा घाटकोपर दुर्घटनेचा अहवाल गृह विभागाला सादर

प्रिंटरमध्ये बिघाड झाल्यामुळे उशीर

मुंबई विद्यापीठाने बुधवार, १५ मे रोजी तृतीय वर्ष विधि शाखेच्या सहाव्या सत्र परीक्षेची ‘महिला व बाल न्याय हक्क कायदा’ या विषयाची प्रश्नपत्रिका सर्व परीक्षा केंद्रांवर वेळेवर पाठविली होती. न्यू लॉ महाविद्यालयाने सदर प्रश्नपत्रिका वेळेवर डाउनलोडही केली. परंतु या महाविद्यालयातील दोनपैकी एक प्रिंटर बिघडला होता. त्यामुळे एका प्रिंटरवरून प्रश्नपत्रिकेच्या प्रती काढण्यास विलंब झाला. या महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना अर्ध्या तासानंतर प्रश्नपत्रिका दिली व तेवढा अधिक वेळसुद्धा देण्यात आला, अशी माहिती मुंबई विद्यापीठ प्रशासनाने दिली.