मुंबई : अंधेरी पूर्व- पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचे बांधकाम वेगाने सुरू आहे. या बहुप्रतिक्षित पुलाच्या एका मर्गिकेचे काम अखेर पूर्ण झाले असून ही मार्गिका आज २६ फेब्रुवारी रोजी सुरू करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. परिणामी, पश्चिम उपनगरातील प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार असल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच, संपूर्ण गोखले पूल पावसाळ्यापूर्वी सुरू करण्याचा पालिकेचा मानस आहे.

अंधेरी येथील गोपालकृष्ण गोखले पुल ७ नोव्हेंबर २०२२ पासून वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. यांनतर अंधेरी परिसरात मोठी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. प्रशासनाकडून गोखले पुलाची एक बाजू सुरू करण्याबाबत अनेकदा मुहूर्त निश्चित करण्यात आले. मात्र, दरवेळी काहीतरी कारणामुळे ते मुहूर्त हुकले. यंदा १५ फेब्रुवारीपर्यंत गोखले पुल प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात येणार होता. मात्र, कामातील तांत्रिक अडचणींमुळे पुन्हा मुहूर्त लांबणीवर गेला. गोखले पुलाची पहिली तुळई (गर्डर) रेल्वे रुळावर स्थापन केल्यानंतर ती खाली आणण्याचे सर्वात आव्हानात्मक काम १९ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट्य ठेवण्यात आले होते. त्याव्यतिरिक्त आणखी एक-दीड मीटरपर्यंत तुळई खाली आणण्याचे काम बाकी होते.

हेही वाचा >>>निवडणुकीतूनच आव्हान? मराठा कार्यकर्त्यांमध्ये चर्चा; आंदोलकांचे मौन

दरम्यान, पुलाची एक मार्गिका सुरू करण्यासाठी २५ फेब्रुवारी हा दिवस निश्चित करण्यात आला होता. अखेर ही सर्व कामे २५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण झाली असल्याने मोठ्या प्रतीक्षेनंतर आज, २६ फेब्रुवारी रोजी पुलाची एक बाजू सुरू करण्यात येणार आहे. परिणामी, अंधेरी परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या काही प्रमाणात कमी होणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा व मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित असतील.

गोखले उड्डाणपूल प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या पहिला गर्डर डिसेंबरमध्ये स्थापित करण्यात आल्यानंतर पुलाच्या कामाला वेग आला. पुलावरून लवकरच दुतर्फा वाहतुक सुरू होणार असून मार्चमध्ये हा मार्ग सेवेत येईल, अशी शक्यता भाजपचे आमदार अमित साटम यांनी व्यक्त केली आहे.