मुंबई : बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाकडून ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या आधारे १० लाख डिजिटल पदविका प्रमाणपत्रे जारी करण्यात येत आहेत. यामुळे बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रांना पायबंद घातला जाणार असून उद्योगांना उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची सत्यता पडताळणी करणे सुलभ होणार आहे, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

यासाठी क्रॉसफोर्स सोल्यूशन्स प्रा. लि.द्वारा विकसित ‘लेजिटडॉक’ हे इथरियम ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरण्यात येणार असून या प्रणालीच्या मदतीने डिजिटल कागदपत्रांची १० सेकंदात जगभरातून कोठूनही ऑनलाइन पडताळणी करता येईल. महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीमार्फत घेण्यात आलेल्या स्टार्टअप मेळाव्यातून ही संकल्पना पुढे आली असून महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळामार्फत याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे प्रमाणपत्रांच्या हाताळणीसाठी वापरले जाणारे मंडळाचे मनुष्यबळ आणि त्यांच्या वेळेचीही बचत होणार आहे, असे मलिक यांनी नमूद केले.

शैक्षणिक प्रमाणपत्रांसाठी जगातील सर्वात मोठय़ा ब्लॉकचेन तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य झाले आहे.