कंगाल स्थितीत जगणाऱ्या स्वच्छंदी नाटय़सेवकाची उत्तरायणातील केविलवाणी कहाणी ; ३० वर्षे रंगभूमीवर काम करूनही परवड

नाटकांमध्ये रमणारा एखादा कलाकार आपले भौतिक आयुष्य विसरून जातो, आणि उत्तरायणात त्याची अवस्था केविलवाणी होते. मायेची माणसे दुरावतात. सारेच हात वर करतात, आणि उत्तरायुष्यात एका छपरासाठी आक्रोश सुरू होतो. ‘कुणी घर देता का, घर?’.. तात्यासाहेब शिरवाडकरांच्या ‘नटसम्राट’ गणपतराव बेलवलकरांसारखे जगणे ‘भोगणाऱ्या’  नटसम्राटावर अशीच वेळ ओढवली. छप्पर गेले. कंगालपण आले, आणि म्हातारपणी छपरासाठी वणवण करायची वेळ आली. सुदैवाने, माणुसकीचे काही झरे जिवंत झाले, आणि या नाटय़वेडय़ाला घर मिळाले. कंगाल अवस्थेत सुमारे पंचवीस वर्षे रस्त्यावर जगलेल्या प्रताप मालेगावकर नावाच्या एका नावाजलेल्या नाटय़कर्मीला छप्पर मिळाले आहे. पुण्याजवळ ‘आपलं घर’ नावाच्या सेवाभावी संस्थेत मालेगावकर उरले आयुष्य सन्मानाने जगण्यासाठी सज्ज झाले आहेत.

पुण्यात ‘नटसम्राट’ चित्रपटाचे शूटिंग सुरू होते, तेव्हा कुणीतरी या मालेगावकरांची नाना पाटेकरांशी भेट घडवून आणली. ‘आता तुम्ही शूटिंग सुरू असेपर्यंत माझ्या डोळ्यासमोर असले पाहिजे’, असे नानांनी मालेगावकरांना सांगितलं, आणि कपडे भरलेली प्लास्टिकची पिशवी काखोटीला मारून ‘नटसम्राट मालेगावकर’ शूटिंगच्या वेळी दोन दिवस नानाच्या नजरेसमोर वावरत राहिले.. शूटिंग संपले, आणि पुन्हा कसबा पेठेतील एका बोळात दुकानाच्या पायरीवर त्यांनी पथारी पसरली. मालेगावकरांना वयपरत्वे गोठविणाऱ्या थंडीचा परिणाम भोगावा लागला.

तापाने फणफणलेले मालेगावकर दुकानाच्या बाजूला पडलेले होते. योगायोगाने जगदाळे नावाच्या महिलेने त्यांना बघितले, आणि  विचारपूस केली.. गेली ३० वर्षे मराठी नाटय़सृष्टीत रमलेल्या प्रताप मालेगावकरांनी रंगभूमीवर केलेली कामे त्या महिलेला आठवली, आणि मराठी नाटय़सृष्टीचा हा स्वच्छंदी सेवक  मरणाशी झगडतो, हे पाहून तिला कणव आली. त्या जोडप्याने मालेगावकरांना बिबवेवाडी येथील इस्पितळात दाखल केले.  दोन दिवसांपूर्वी मालेगावकरांना इस्पितळामधून सोडण्यात आले, पण कुठे जायचे हा प्रश्न होताच. या उपचारादरम्यान त्यांची काळजी घेणाऱ्या जगदाळे कुटुंबाने पुण्यातील अनेक वृद्धाश्रमांशी संपर्क साधला. पण पैसे नसतील तर प्रवेश नाही, असाच अनुभव त्यांना आला. मग त्यांना विजय फळणीकरांचे नाव आठवले. सिंहगडाच्या पायथ्याशी गोळेवाडी येथे ‘वैभव फळणीकर मेमोरियल फौंडेशन’च्या ‘ज्येष्ठ नागरिक सेवा केंद्रा’त प्रवेश मिळेल का, अशी विचारणा केली.

नाटय़सेवेसाठी आयुष्य वेचणाऱ्या एका कलावंतासाठी ‘आपलं घर’ उघडं आहे, अशी ग्वाही विजय फळणीकरांनी त्यांना दिली, आणि शुक्रवारी, मालेगावकर ‘आपलं घर’मध्ये दाखल झाले. एक नाटय़वेडा अखेर वृद्धाश्रमात आला..