मुंबईः अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घरावर झालेल्या गोळीबाराप्रकरणी मुंबई पोलिसांनी हरपाल सिंह (३४) याला हरियाणातून अटक केली. विशेष मोक्का न्यायालयाने आरोपीला २२ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कुख्यात लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोलला आरोपी हरपाल सिंहने अभिनेता सलमान खानच्या घराचे चित्रीकरण पाठवल्याचा आरोप आहे. लॉरेन्स बिष्णोई टोळीसाठी खंडणी वसूल करण्याचे काम हरपाल सिंह करीत होता. याप्रकरणातील ही सहावी अटक आहे.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, हरपाल सिंह याला हरियाणातील फतेहाबाद येथून सोमवारी सायंकाळी अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. यापूर्वी अटक आरोपी मोहम्मद रफीक चौधरी याला हरपाल सिंहने सलमानच्या घराची पाहणी करण्यास सांगितले होते. सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या सागर पाल आणि विक्की गुप्ता यांची चौधरीने दोन वेळा मुंबईत भेट घेतली होती. सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानाची पाहणी करण्यातही त्याचा सहभाग होता. चौधरी गेल्या पाच – सहा वर्षांपासून बिश्नोई टोळीच्या संपर्कात होता आणि टोळीमध्ये तरुणांना भरती करण्यातही त्याचा सहभाग असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. चौधरीच्या चौकशीत हरपाल सिंहचे नाव उघड झाले होते. या कामासाठी चौधरीला हरपाल सिंहने रक्कमही दिली होती. सलमानच्या घराच्या पाहणीचे चित्रीकरण चौधरीमार्फत हरपाल सिंहला मिळाले होते. पुढे हरपालने टेलिग्राम ॲप्लिकेशनद्वारे ते चित्रीकरण लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोलला पाठवले होते. हरपाल सिंह लॉरेन्स बिष्णोई टोळीसाठी खंडणी वसूल करीत होता. त्याच्याविरोधात यापूर्वी गोळीबाराचाही गुन्हा दाखल आहे.
हेही वाचा : मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये पुढील तीन तासांत वादळी पावसाची शक्यता
सलमानच्या घरावर १४ एप्रिल रोजी गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी विकी साहब गुप्ता आणि सागर श्रीजोगेंद्र पाल यांना गुजरातमधून अटक केली होती. त्यांना पिस्तुल पुरवल्याप्रकरणी सोनू सुभाषचंदर बिष्णोई (३७) व अनुज थापन (३२) यांना पंजाब येथून अटक करण्यात आली होती. याप्रकरणातील आरोपी अनुज थापन याने नुकतीच पोलीस कोठडीत आत्महत्या केली होती. त्यानंतर याप्रकरणी मुंबई पोलिसांनी चौधरीला अटक केली. चौधरीने दिलेल्या माहितीच्या आधारे आता हरपाल सिंहला अटक करण्यात आली. त्याशिवाय टोळीचा म्होरक्या लॉरेन्स बिष्णोई व त्याचा भाऊ अनमोल यांनाही गुन्ह्यात आरोपी करण्यात आले होते. या प्रकरणी मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.