‘चार शब्द’ या दिवाळी अंकाचे संपादक आणि चित्रकार अरुण मानकर यांचे सोमवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन पुत्र, एक सून, एक नातू, एक भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. ‘टॉनिक’ या लहान मुलांच्या मासिकाचे संपादक मानकर काका हे अरुण मानकर यांचे चुलत भाऊ आहेत.
सोमवारी रात्री त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने नायर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र येथे उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. दिवाळी अंकाच्या संपादनाबरोबरच पुस्तकांची सजावट, दिवाळी अंकातील चित्रे यातही त्यांनी आपले योगदान दिले होते. ‘टॉनिक’ या दिवाळी अंकातून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली.
१९८० मध्ये ‘टॉनिक’चा संपूर्ण दिवाळी अंक अरुण मानकर यांनी आपल्या स्वत:च्या हस्ताक्षरात लिहून काढला होता. चंद्रकांत खोत यांच्या ‘अबकडई’ या दिवाळी अंकांची मुखपृष्ठे तसेच आतील चित्रे मानकर यांनी रेखाटली होती. खोत यांच्याच ‘बिंब प्रतिबिंब’ आणि ‘संन्याशाची सावली’ या पुस्तकांची सजावटही मानकर यांनी केली होती.
विद्यार्थी उत्कर्ष मंडळाचे ते कार्यकर्ते होते. या मंडळाच्या विवेकानंद व्याख्यानमालेचेही काम त्यांनी केले होते. चित्रकार, सुलेखनकार अशीही त्यांची ओळख होती.