लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : प्रवाशांना कोणत्याही ठिकाणी बसून राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसचे तिकीट काढता यावे यासाठी अधिकृत संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. तसेच मोबाइलवरील ॲपच्या माध्यमातून प्रवाशांना तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. परिणामी, १ जानेवारी ते २० मे २०२४ या कालावधीत १२ लाख ९२ हजार तिकीटांची विक्री झाली. गेल्यावर्षी याच कालावधीत ९.७५ लाख तिकीटांची विक्री झाली होती. गतवर्षाच्या तुलनेत यंदा तिकीट विक्रीत सुमारे तीन लाखांनी वाढ झाली आहे. यावरून नव्या ऑनलाइन आरक्षण प्रणालीला प्रवाशांचा प्रतिसाद वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे.

एसटी महामंडळाने अधिकृत संकेतस्थळ आणि एमएसआरटीसी बस रिझर्व्हेशन ॲप सुरू केले होते. मात्र या दोन्हीमध्ये तांत्रिक त्रुटी असल्याने प्रवाशांना तिकिटे आरक्षित करताना अडचणी येत होत्या. तिकिटाचे आरक्षण करताना पैसे वजा होत होते, मात्र तिकीट मिळत नसल्याची तक्रार वारंवार प्रवाशांकडून एसटी महामंडळाकडे करण्यात येत होती. त्यामुळे एसटी महामंडळाने १ जानेवारी २०२४ रोजी यात बदल करून संकेतस्थळ आणि ॲप अद्ययावत केले. यातील त्रुटी दूर केल्याने ऑनलाइन प्रणाली प्रवाशांना वापरण्यास अत्यंत सोपी व सुलभ झाली. तसेच दोन्ही प्रणालीद्वारे प्रवाशांना अमृत जेष्ठ नागरिक, जेष्ठ नागरिक, महिला सन्मान योजना, दिव्यांग व्यक्ती अशा विविध सवलतींचे आगाऊ आरक्षण मिळणे शक्य झाले. सध्या या ऑनलाइन आरक्षण प्रणालीद्वारे दररोज १० हजार तिकीटे काढली जात आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.

आणखी वाचा-मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर गॅन्ट्री बसविण्यासाठी गुरुवारी एका तासाचा वाहतूक ब्लॉक

ऑनलाइन आरक्षण करताना प्रवाशांना तांत्रिक अडचण आल्यास मोबाइल क्रमांक ७७३८०८७१०३ वर संपर्क साधावा. प्रवाशांच्या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी ही सेवा २४ तास सुरू असणार आहे. तसेच ऑनलाइन आरक्षण करताना पैसे भरल्यानंतरही तिकिटे उपलब्ध न झाल्यास दूरध्वनी क्रमांक ०१२०-४४५६४५६ वर तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.