मुंबई : मध्य रेल्वे प्रशासन रेल्वे स्थानकांत महिलांसाठी उच्च दर्जाची स्वच्छतागृहे उपलब्ध करीत असतानाच, दुसरीकडे सीएसएमटी स्थानकातील स्वच्छतागृहे बंद केली जात आहेत. महिलांसाठी दूरवर गर्दीच्या ठिकाणी पर्यायी स्वच्छतागृह उपलब्ध करण्यात आले असून महिलांना तिथवर जाऊन स्वच्छतागृहांच्या रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे महिला प्रवाशांची प्रचंड कुचंबणा होत आहे.

पुरुषांचे स्वच्छतागृह बंद करून वातानुकूलित स्वच्छतागृहे सुरू करण्यात आली आहेत. मात्र, सीएसएमटीवरील प्रवाशांच्या गर्दीच्या तुलनेत ही स्वच्छतागृहे अपुरी पडत आहेत. परिणामी, स्वच्छतागृहात जाण्यासाठी प्रवाशांना १० ते १५ मिनिटे रांगेत उभे राहावे लागते. यामुळे मधुमेह, मूत्रपिंड विकार असलेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

हेही वाचा – महायुतीत दोन जागांचा तिढा अद्याप कायम; रत्नागिरी-सिंधुदुर्ग, साताऱ्यासह ११ मतदारसंघांत आजपासून निवडणूक प्रक्रिया

मध्य रेल्वेवरील सर्वाधिक वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असलेल्या सीएसएमटी येथून दररोज ११ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. हजारो प्रवासी सीएसएमटी स्थानकावरील फलाट क्रमांक ५ – ६ समोरील स्वच्छतागृहाचा वापर करतात. पुरुषांसाठी जानेवारी २०२४ मध्ये वातानुकूलित स्वच्छतागृह खुले करण्यात आले. त्यामुळे पुरुषांना वातानुकूलित आणि सर्वसाधारण अशी दोन स्वच्छतागृहे उपलब्ध झाली. मात्र काही दिवसांपूर्वी अचानक महिलांचे आणि पुरुषांचे सर्वसाधारण स्वच्छतागृह बंद करण्यात आले. पुरुषांना वातानुकूलित स्वच्छतागृहाचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र, स्थानकावरील गर्दी लक्षात घेता स्वच्छतागृहात जाण्यासाठी हजारो प्रवाशांना रांगेत उभे राहावे लागत आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी आवश्यकतेनुसार स्वच्छतागृहाची उभारणी करणे गरजेचे असताना आलिशान स्वच्छतागृहे उभारण्यात आली. यामुळे एकाच वेळी शेकडो प्रवाशांची गर्दी स्वच्छतागृहात होते. शिवाय वृद्ध, मधुमेहग्रस्त, मूत्रपिंड विकाराने त्रस्त प्रवाशांची गैरसोय होत आहे.

उपनगरीय रेल्वेगाड्यांमधून प्रवास करणाऱ्या महिलांसाठी सीएसएमटीच्या फलाट क्रमांक ५-६ वर स्वच्छगृहाची सोय होती. मात्र, ते महिलांना कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक बंद करण्यात आले. तसेच या स्वच्छतागृहाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आले असून तेथे महिला आणि पुरुषांसाठी स्वच्छतागृह उभारण्यात येत आहे. त्यामुळे महिलांनी ‘सीएसएमटी’च्या फलाट क्रमांक १४ -१५ वरील स्वच्छतागृह वापर करावा, अशा आशयाचे फलक तेथे लावण्यात आले आहेत. परंतु, महिलांना पर्याय म्हणून लांब, गर्दीच्या ठिकाणी स्वच्छतागृह उपलब्ध करण्यात आले आहे. फलाट क्रमांक ५-६ वरील स्वच्छतागृहात एकूण ४ ते ५ शौचकूप होती. तर फलाट क्रमांक १४ – १५ वरील स्वच्छगृहात फक्त ३ शौचकूप आहेत. त्यामुळे सध्या या स्वच्छतागृहात प्रचंड गर्दी होऊ लागली आहे. लांबपल्ल्याच्या, तसेच उपनगरी रेल्वेगाड्यांतील महिला प्रवाशांना एकाच स्वच्छतागृहावर अवलंबून राहावे लागत आहे.

हेही वाचा – संसद ताब्यात घ्या; पण मित्रपक्षांचाही मान राखा! शिंदे गटाचे खासदार कीर्तिकर यांचा मोदींना टोला

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील महिलांचे, पुरुषांचे सर्वसाधारण स्वच्छतागृह अचानक बंद करण्यात आले. कर्जत, कसारा, टिटवाळा, बदलापूरहून सीएसएमटी स्थानकात येणाऱ्या महिलांसाठी स्वच्छतागृहे उपलब्ध नाहीत. पर्यायी सुविधा लांब आणि गर्दीच्या ठिकाणी असल्याने महिलांना तेथपर्यंत पोहचणे कठीण झाले आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने महिलांचे स्वच्छतागृह बंद करताना कोणताही विचार केला नाही. तसेच याबाबत जनसामान्यांना पूर्वसूचना देण्यात आलेली नाही. त्यामुळे स्वच्छतागृह बंद करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणे आवश्यक आहे. – लता अरगडे, सरचिटणीस, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ

महिला शौचालय हे वातानुकूलित शौचालयाच्या धर्तीवर पुनर्निर्मित केले जात आहे. यासाठी काही काळ प्रवाशांना त्रास सहन करावा लागेल. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासन करत आहे. – डॉ. स्वप्नील निला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे