स्थानिक रहिवासी असलेल्या सेलिब्रिटी आणि उच्चभ्रूंच्या विरोधामुळे रखडलेल्या पेडर रोड उड्डाणपुलाच्या कामास परवानगी देण्याची शिफारस केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या समितीने केल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे २०१३ मध्ये या प्रकल्पाचे काम सुरू होईल, अशी आशा ‘एमएसआरडीसी’तील सूत्रांनी स्पष्ट केले.  
दक्षिण मुंबईतून आणि पश्चिम उपनगरांदरम्यानच्या वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी हाजीअली चौकापासून ते गिरगाव चौपाटीपर्यंत ४.२ किलोमीटर लांबीचा पेडर रोड उड्डाणपूल बांधण्याचा ‘एमएसआरडीसी’चा प्रकल्प गेल्या दशकभरापासून रेंगाळला आहे. मागच्या वर्षी जुलै २०११ मध्ये या प्रकल्पासाठी पर्यावरण सुनावणी मुंबईत पार पडली आणि तिचा अहवाल केंद्रीय वन व पर्यावरण विभागाकडे गेला. या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवणारे बैठकीचे इतिवृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले.
पर्यावरण परवानगीचा प्रत्यक्ष आदेश येण्याची औपचारिकता पूर्ण होईपर्यंत वेळ वाया न घालवता इच्छुक कंपन्यांकडून निविदा मागवण्याचे काम सुरू केले आहे, असे ‘एमएसआरडीसी’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. या उड्डाणपुलासाठी ३८० कोटी रुपये खर्च येईल, असे निविदेच्या जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे.