हुंडा ही प्रथा बंद करण्यासाठी जनजागृती मोहीम राबवूनही हुंडा मागण्याचे प्रकार थांबताना दिसत नाहीत. हुंड्यासाठी सुनांचा छळ करून त्यांची विक्री करण्याचा प्रकार विरारमध्ये उघडकीस आला. या प्रकरणी विरार पोलिसांनी १२ जणांवर गुन्हे दाखल केले असले तरीही अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. दोन सख्ख्या बहिणी ज्या ज्या दोन सख्ख्या जावा झाल्या होत्या त्यांना विकण्यात आले. या दोघींची राहण्याची व्यवस्था त्यांच्याच घरात पोलिसांनी करून दिली आहे. त्यांच्या सासरचे लोक राजस्थानचे असून ते फरार झाले आहेत.

विरार येथील संजय व वरूण रावल या दोन भावांनी दोन सख्ख्या बहिणींसोबत २०१५ साली लग्न केले. मात्र लग्नानंतर रावल कुटुंबीयांनी हुंड्यासाठी या दोन्ही बहिणींवर अनेक अत्याचार सुरू केले . पैसे आणण्यासाठी त्यांचा शारिरीक व मानसिक छळ करण्यात येत होता. दहा लाखांहून अधिक रक्कम सासरच्या लोकांनी मागितली होती. आणखी पैसे मिळणार नाही हे लक्षात येताच सासरच्या लोकांनी दोन्ही बहिणींना राजस्थानमधील विरवडा येथे नेऊन जाळून ठार मारण्याची धमकी देत एका व्यक्तीला या दोघींची दीड लाखात विक्री केली होती.

३० ऑगस्ट रोजी या दोघींना मूळ गावी राजस्थान येथे गेले होते. तेथून त्यांना एका अनोळखी व्यक्तीला दीड लाखात विकले होते. मात्र प्रवासादरम्यान हा प्रकार लक्षात येताच त्यांनी इतर प्रवाशांच्या मदतीने आपली सुटका करवून घेतली होती. हे प्रकरण उघडकीस येताच शहरात खळबळ उडाली होती. विरार पोलिसांनी या महिलांच्या कुटुंबीयांमधील १२ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. आम्ही या महिलांना राहण्यासाठी त्यांचे घर उघडून दिले आहे. पुढील कारवाईसाठी त्याच्या कुटुंबीयांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती विरारचे पोलीस उपअधीक्षक जयंत बजबळे यांनी दिली.