पुण्यातील ‘फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’ (एफटीआयआय) या संस्थेच्या अध्यक्षपदी अभिनेता गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीवरून सुरू झालेला वाद अद्याप संपण्याची चिन्हे नाहीत. चौहान यांच्या नेमणुकीविरोधात संस्थेतील विद्यार्थ्यांनी याअगोदरच आंदोलन सुरू केले असून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.
राजकुमार राव, अमोल पालेकर, सुधीर मिश्रा यांनी चौहान यांच्या नियुक्तीला विद्यार्थ्यांकडून होणारा विरोध आणि त्यांचा मागितलेला राजीनामा या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. ‘एफटीआयआय’सारख्या संस्थेचे प्रमुखपद चौहान यांनी भूषविणे हे श्रेयस्कर नाही. चौहान यांची नियुक्ती झाल्यापासून अर्थात गेल्या २९ दिवसांपासून विद्यार्थी आंदोलन करत आहेत. राजकुमार राव यांनी ‘ट्विटर’वर आपली भूमिका मांडली आहे, तर पालेकर म्हणाले, समजा चौहान यांच्या जागी माझी नियुक्ती झाली असती आणि मलाही असा प्रचंड विरोध झाला असता, तर मी एक क्षणही त्या पदावर राहिलो नसतो, तर या पदासाठी चौहान हे योग्य नाहीत, असे मत मिश्रा यांनी व्यक्त केले.
अनुपम खेर, रसुल पुकुट्टी, अदुर गोपालकृष्णन, ऋषी कपूर, पीयूष मिश्रा आदींनीही चौहान यांच्या नियुक्तीला विरोध केला आहे. आपल्या नियुक्तीवरून अनुपम खेर, ऋषी कपूर यांनी केलेल्या टिप्पणीवरून आपण त्यांना कोणतेही अपशब्द वापरले नाहीत किंवा त्यांचा अपमान केलेला नाही. ते दोघेही ज्येष्ठ आहेत. आपली भूमिका मांडण्याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, असे चौहान यांनी म्हटले आहे. दरम्यान माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राजवर्धन सिंह राठोड यांनी चौहान यांच्या नियुक्तीचे समर्थन केले आहे.
खासदार रामदास आठवले यांनी चौहान यांच्या नेमणुकीवरून होणारा प्रचंड विरोध पाहता त्यांनी तातडीने संस्थेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. रिपब्लिकन पक्षाच्या चित्रपट शाखेचे उद्घाटन झाल्यानंतर आठवले यांनी ही मागणी केली. अभिनेत्री व गायिका सलमा आगा यांची चित्रपट शाखेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली