टाळेबंदीमुळे बाहेर फिरण्यावर निर्बंध; प्राणिपालकांच्या चिंतेत भर

रसिका मुळ्ये, लोकसत्ता

मुंबई : मांजर किंवा श्वानांचे खाद्यपदार्थ, उत्पादने ही अत्यावश्यक सेवांमध्ये गणली जात असली तरी प्रत्यक्षात प्राणीपालकांना खाद्य, लिटर सँड, औषधे मिळवण्यासाठी जंग जंग पछाडावे लागत आहेत. अनेक परदेशी कंपन्यांचे पशुखाद्य, विशिष्ट आजार, प्रजाती, वय यानुसार असलेले खाणे मिळत नसल्यामुळे प्राणीपालकांची धावपळ सुरू आहे.

कॅट फूड, डॉग फूडच्या निर्मितीमध्ये अनेक भारतीय कंपन्यांनी आपले स्थान निर्माण केले असले तरीही अद्यापही या बाजारपेठेवर परदेशी कंपन्यांचा वरचष्मा आहे. अमेरिका, मेक्सिको, युरोप येथील कंपन्यांची उत्पादने भारतीय बाजारपेठांमधील गल्लीबोळातील दुकानांमध्येही मिळू लागली होती. सध्या टाळेबंदी आणि अनेक परदेशी कंपन्यांच्या उत्पादनावरील परिणाम यांमुळे भारतीय प्राणीपालकांची चिंता वाढवली आहे. प्राण्यांचे खाद्य आणि त्यांच्या निगराणीसाठी आवश्यक असलेले घटक, औषधे यांची विक्रीही अत्यावश्यक सेवांमध्ये ग्राह्य़ धरण्यात आली आहे. मात्र, पुरवठा करणारी यंत्रणा काहीशी विस्कळीत झाल्यामुळे घरातील प्राण्यांच्या खाण्याची सोय करताना पालक मेटाकुटीला आले आहेत.

अनेक नामांकित परदेशी कंपन्यांचे खाद्य सध्या मिळत नाही. भारतीय कंपन्यांचे खाद्य उपलब्ध असले तरी त्यामध्ये विशेष गरजा असलेल्या प्राण्यांसाठीचे खाद्य मिळत नाही. परदेशी कंपन्यांचे प्रजाती, वय, प्रकृती यांनुसार खाद्य मिळते. आजारी असलेल्या प्राण्यांसाठी काही विशिष्ट प्रकारच्या खाद्याची शिफारस पशुवैद्य करतात, त्याचाही तुटवडा आहे.

‘परदेशी कंपन्यांचे खाणे पुरेसे येत नाही. नेहमीच्या ग्राहकांना साध्य असलेले खाणे आम्ही देतो,’ असे सायन येथील ‘जिगर पेट्स’च्या हृषी कवल यांनी सांगितले. ‘प्राण्यांना सवय असलेलेच खाणे बहुतेक वेळा लागते. अनेक प्राणी नवे खाणे पटकन स्वीकारत नाहीत. मूत्राशयाचे आजार असलेल्या प्राण्यांसाठी, स्थूल प्राण्यांसाठी असलेले विशेष खाण्याचा पुरवठा कमी होतो आहे. सध्या प्राण्यांना र्निजतुक करणाऱ्या औषधी फवाऱ्यांचीही मागणी आहे. त्यातही भारतीय ब्रँड्सची औषधे उपलब्ध आहेत,’ असे अंधेरी येथील ‘पेट कनेक्ट’च्या रोशन शहा यांनी सांगितले.

ऑनलाइन बाजारही ठप्प

सध्या पशुवैद्यांच्या दवाखान्याला जोडून पशुखाद्याची आणि साहित्याची दुकाने बहुतेक ठिकाणी आहेत. मात्र, सध्या पशुवैद्यांनीही दवाखाने बंद ठेवले आहेत. दुकानेही अगदी प्रत्येक भागांत नाहीत. त्याचप्रमाणे ऑनलाइन खरेदीचाही पर्याय खुंटला आहे. पशुखाद्य आणि साहित्याची संकेतस्थळावर मोठय़ा प्रमाणात विक्री होते. संकेतस्थळांवरही बहुतांश कंपन्यांचे खाणे उपलब्ध नाही. त्याचप्रमाणे ऑनलाइन खरेदी-विक्री कंपन्याही पशुखाद्य घरपोच पुरवण्यासाठी नकार देत आहेत.

फिरवण्यास बंदी, लिटर सँडही नाही

श्वानांना व्यायामाबरोबरच त्यांचे नैसर्गिक विधी उरकण्यासाठीही फिरवण्याची गरज असते. मात्र, सध्या अनेक सोसायटय़ांनी आवारात श्वानांना फिरवण्यास बंदी घातली आहे. सोसायटीच्या बाहेर जाण्यासही मुभा नाही. प्राण्यांना घरात, गच्चीत ठरावीक ठिकाणी नैसर्गिक विधी करता यावेत यासाठी असलेली लिटर सँडही ऑनलाइन किंवा दुकानांमध्ये पुरेशी मिळत नसल्याची तक्रार प्राणीपालकांनी करत आहेत.