दुरुस्तीसाठी लागणाऱ्या साहित्याची कमतरता

मुंबई : संपूर्ण टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवरदुरुस्तीच्या साहित्याची विक्रीदेखील बंद असल्यामुळे अनेक प्लंबर आणि इलेक्ट्रिशियनची कसरत होत आहे. त्यामुळे आयत्यावेळी उद्भवलेल्या तातडीच्या दुरुस्तीवर तात्पुरती मलमपट्टी करावी लागत आहे.

संपूर्ण टाळेबंदी जाहीर केल्यानंतर जीवनावश्यक वस्तूंची सुविधा उपलब्ध असून वीज आणि पाणीपुरवठा सुरळीत आहे. मात्र घरगुती अथवा इमारतीच्या संदर्भात प्लंबिंग अथवा विजेच्या उपकरणांची आयत्यावेळी दुरुस्ती उद्भवल्यास कारागिरांच्या उपलब्धतेपासून, दुरुस्तीच्या साहित्याची कमतरता भासत आहे.

गेल्या तीन दिवसांत तातडीच्या दुरुस्तीची मागणी आलेले प्लंबर सांगतात की, आमच्याकडे प्राथमिक गरजेची सामग्री असते, पण एखादे विशिष्ट साहित्य दुकानातूनच विकत घ्यावे लागते. पण सध्या या सुविधेशी निगडीत सर्वच दुकाने बंद असल्यामुळे तात्पुरती जुळवाजुळव करावी लागल्याचे ते नमूद करतात, तर काहीजण नेहमीच्या दुकानदाराशी संपर्क साधून कसेबसे साहित्य मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. दुरुस्तीच्या कामासाठी कोणी बोलावले तरी पोलिसांच्या पहाऱ्यामुळे बाहेर पडताना विचार करावा लागत असल्याचे हे कारागीर सांगतात.

मुंबईत अनेक कंत्राटदार अशा प्रकारच्या सुविधा एकाच ठिकाणाहून पुरवतात. अशा कंत्राटदारांकडील अनेक कारागीर उपनगरातून शहरात येत असतात. सध्या वाहतुकीची सेवा केवळ जीवनावश्यक सुविधांपुरतीच मर्यादित असल्यामुळे या कारागिरांना बोलावणे कठीण असल्याचे कंत्राटदार नमूद करतात. तर अनेक कारागीर हे मागील आठवडय़ातच आपल्या मूळ गावी गेल्यामुळे त्यांची उपलब्धतादेखील कमी झाली आहे. गेल्या तीन दिवसांत अशा प्रकारची गरज भासली नसल्याचे दादरस्थित कंत्राटदार सतिश साठे यांनी सांगितले. पण गरज पडलीच तर आयत्यावेळी जे उपलब्ध असेल त्यातच काम भागवावे लागेल, असे ते म्हणाले.

दुसरीकडे अनेक गृहनिर्माण सोसायटींचे स्वत:चे प्लंबर आणि इलेक्ट्रिशियन बांधलेले आहेत. पण त्यांनादेखील अशा बाबींची कमतरता भासू शकते, असे या कारागिरांनी सांगितले. पुढील काही काळ घरातच राहायचे असल्यामुळे अनेकांनी साफसफाईची कामेदेखील काढली आहेत. पण ही कामे करताना पाणी आणि विजेच्या उपकरणांबाबतीत एखादी दुरुस्ती उद्भवतानाचे अनुभव येत आहेत. त्यामुळे पंखा आणि अन्य विजेवरील उपकरणे बंद पडून समस्या उभी राहण्याचे प्रसंग आल्याचे काही जणांनी सांगितले.

सोसायटीमध्येच सुरक्षारक्षकांची सोय

टाळेबंदीमुळे गृहनिर्माण सोसायटीच्या सुरक्षारक्षकांना प्रवास करणे कठीण असल्याच्या पार्श्वभूमीवरकाही मोठय़ा गृहनिर्माण सोसायटींनी सुरक्षारक्षकांची सोय इमारतीच केली आहे. मात्र छोटय़ा स्तरावरील सोसायटींना अशा सुविधा देणे शक्य नसल्याचे काही ठिकाणी दिसून येत आहे. मुलुंड येथील झेनिथ सहकारी सोसायटीने सुरक्षारक्षकांना सोसायटीच्या इमारतीतच जेवण आणि राहण्याची सुविधा दिली असल्याचे रहिवाशी राहुल मेश्राम यांनी सांगितले.

गृहनिर्माण सोसायटींची खबरदारी

करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अनेक मोठय़ा गृहनिर्माण सोसायटींनी खबरदारीच्या उपायांमध्ये वाढ केली आहे. अनेक ठिकाणी सोसायटीचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले असून, सोसायटीबाहेरील लोकांना प्रवेश बंद केला आहे. बाहेर गेलेल्या प्रत्येकाने प्रवेश करण्यापूर्वी सॅनिटायझरचा वापर करणे, हात धुवून मगच येण्याचे बंधन घातले आहे. काही मोठय़ा उच्चभ्रू सोसायटीमध्ये तर लिफ्ट, दरवाजे रोजच्या रोज र्निजतुक केले जात आहेत.