केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना वादग्रस्त विधान केल्याने शिवसेनेकडून संताप व्यक्त केला जात आहे. रायगड येथील महाडमध्ये राणेंची जन आशिर्वाद यात्र पोहचली त्यावेळी पत्रकारांशी बोलताना स्वातंत्र्य दिनाच्या भाषणावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना राणेंनी मी असतो तर कानाखाली लगावली असती असं वक्तव्य केल्याचं पहायला मिळालं. या वक्तव्यानंतर मध्यरात्रीच दादरमध्ये नारायण राणेंचे मोठ्या आकाराचे पोस्टर्स शिवसेनेकडून लावण्यात आले असून त्यावर ‘कोंबडी चोर’ असं लिहिलेलं आहे.

नक्की वाचा >> नारायण राणेंच्या मुख्यमंत्र्याबद्दलच्या ‘त्या’ वक्तव्याचे पडसाद मुंबईत?; रात्री एक वाजता Tweet करत नितेश राणे म्हणाले…

नारायण राणेंच्या या वक्तव्या विरोधात मध्यरात्रीच दादरमध्ये पोस्टरबाजी करण्यात आली. स्थानिक शिवसेना नगरसेवक अमेट घोले यांनी दादर टीटी परिसरात पोस्टरबाजी केली होती. मात्र पोलिसांनी अवघ्या एक तासात हे पोस्टर हटवले आहेत. राणेंविरोधात लावलेले हे पोस्टर जरी काढून टाकले असले तरी या पोस्टर्सचे फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालेत. या पोस्टरमध्ये राणेंचा क्लोजअप फोटो लावून त्याच्या बाजूला कोंबडी चोर असं लिहिण्यात आलं आहे. याखाली पोस्टर लावणारे नगरसेवक घोले यांच्या नावाचाही उल्लेख आहे.

राणे नक्की काय म्हणाले?

सोमवारी रायगडमधील महाड येथे राणेंची जन आशीर्वाद यात्रा पोहचली. यावेळी पत्रकारांशी बोलताना राणेंंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. त्याचवेळी त्यांनी स्वातंत्र्यदिनाचा उल्लेख करत, “त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हिरक मोहत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती,” असं म्हटलं.

“महाराष्ट्रात यांच्यामुळे एक लाखा पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला, मात्र काही उपाय नाही. लस नाही, डॉक्टर नाहीत, वैद्यकीय कर्मचारी नाहीत. भयावह परिस्थिती महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाची होती. यांना बोलायचा अधिका तरी आहे का? बाजूला एखाद सेक्रेटरी ठेव आणि विचारून बोल. त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हिरक मोहत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती. देशाच्या स्वातंत्र्य दिनाबाबत तुम्हाला माहिती नसावी? सांगा मला किती चीड येणारी गोष्ट आहे. सरकार कोण चालवतय ते कळत नाही, ड्रायव्हरच नाही. राष्ट्रवादी मात्र सत्ता उपभोगते आहे.” असं नारायण राणे यांनी म्हटलं होतं.

नितेश राणेंचा इशारा…

राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी ट्विटरवरुन रात्री राणेंच्या जुहूतील घराबाहेर युवासेनेच्या कार्यकर्त्यांना जमण्यास सांगण्यात आल्याचं म्हटलं आहे. तसेच नितेश राणेंनी सिंहाच्या गुहेमध्ये प्रवेश करण्याची हिंमत करु नका असा इशारा शिवसेनेला दिलाय.