डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत निवृत्त सफाई कामगारांच्या घरांसाठी महानगरपालिकेने आता एमएमआरडीएचे दरवाजे ठोठावले आहेत. मात्र एमएमआरडीएकडून अद्याप त्यास कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.
महापालिकेत २५ वर्षे पूर्ण करून निवृत्त झालेल्या अथवा सेवेत असतानाच निधन पावलेल्या सफाई कामगारांच्या वारसांना या योजनेअंतर्गत निवासस्थान देण्याची घोषणा काही वर्षांपूर्वी महापालिकेने केली होती. या योजनेंतर्गत २००९ मध्ये चेंबूर येथे ५० कामगारांना घरे देण्यात आली. मात्र त्यानंतर ही योजना शीतपेटीत बंद झाली.
आता महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी ही योजना यशस्वी करण्यासाठी एमएमआरडीएला साद घातली आहे. निवृत्त सफाई कामगारांसाठी ८०० घरे द्यावीत अशी मागणी त्यांनी एमएमआरडीएकडे केली आहे, अशी माहिती सफाई कामगार नेते महेंद्र साळवे यांनी दिली.
सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसाठी कामगार नेत्यांनी सोमवारी सीताराम कुंटे यांची भेट घेतली. या बैठकीत महेंद्र साळवे यांच्यासोबत म्युनिसिपल मजदूर संघाचे सरचिटणीस नागसेन कांबळे, म्युनिसिपल मजदूर युनियनचे उपाध्यक्ष महेश महिडा उपस्थित होते.
सफाई कामगारांसाठी मुंबईत टप्प्याटप्प्याने २८ हजार सेवा निवासस्थाने बांधण्यात येणार असून त्यासाठी अर्थसंकल्पात १८०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. २०१३-१४ च्या अर्थसंकल्पात यासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आगामी वर्षांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी मिळताच छत्रपती शिवाजी टर्मिनस परिसरातील कोचिन स्ट्रीट येथे निवासस्थानांच्या बांधकामासाठी निविदा मागविण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले, असे साळवे म्हणाले.