रेल्वे अर्थसंकल्पाकडून उपनगरीय प्रवासी मोठी अपेक्षा ठेवत असले, तरी दरवर्षी नेमाने या प्रवाशांचा अपेक्षाभंग होत असतो. त्यामुळे यंदा विविध प्रवासी संघटनांनी रेल्वे अर्थसंकल्पाच्या तोंडावर रेल्वे मंत्रालयाकडून कोणत्याही नव्या घोषणेची अपेक्षा ठेवलेली नाही. गेल्या काही अर्थसंकल्पांमध्ये केलेल्या घोषणा पूर्ण कराव्यात, त्याशिवाय कोणतीही नवीन घोषणा करू नये, अशी भूमिका या संघटनांनी घेतली आहे.
गेल्या दोन अर्थसंकल्पांमध्ये उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी तत्कालीन रेल्वेमंत्र्यांनी घोषणांचा पाऊस पाडला. त्याआधीच्या अर्थसंकल्पांमध्ये जाहीर केलेल्या ‘एमयूटीपी’ या प्रकल्पाचा दुसरा टप्पा अद्यापही पूर्ण झालेला नाही. या दुसऱ्या टप्प्यातील मध्य रेल्वेवरील ५-६वी मार्गिका, पश्चिम रेल्वेवरील ६वी मार्गिका, हार्बर मार्गाचे गोरेगावपर्यंत विस्तारीकरण, हार्बर मार्गावर १२ डब्यांच्या गाडय़ा, कल्याणच्या पुढे कर्जत-कसारा मार्गाचे चौपदरीकरण आदी गोष्टी अद्यापही पूर्ण झालेल्या नाहीत. मोदी सरकारच्या अंतरीम रेल्वे अर्थसंकल्पात मुंबईकरांसाठी नव्या ८६४ डब्यांची घोषणा झाली होती. मात्र हे बंबार्डिअर कंपनीचे डबे अद्यापही प्रत्यक्षात मार्गावर धावलेले नाहीत. हे सर्व प्रकल्प उपनगरीय प्रवाशांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आणि दिलासादायक आहेत.
रेल्वे मुंबईकरांसाठी विविध घोषणा करते, मात्र त्या पूर्णत्त्वास येत नाहीत. रेल्वेकडे निधीची वानवा आहे, याची आम्हाला कल्पना आहे. त्यामुळेच रेल्वेने आणखी नव्या घोषणा करण्याऐवजी केलेल्या घोषणांची पूर्तता करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षा उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या नंदकुमार देशमुख यांनी व्यक्त केली. या प्रकल्पांपैकी मध्य रेल्वेवरील पाचव्या-सहाव्या मार्गिकेच्या प्रकल्पाला प्राधान्य देण्याची गरजही महासंघाच्या लता अरगडे यांनी बोलून दाखवली.