भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदु मिलसारखी मोठी जागा दिली जाते. लंडनमधील बाबासाहेबांचे वास्तव्य असलेली जागा विकत घेऊन तेथे स्मारक केले जाते मग शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी अशीच मोठी जागा का दिली जात नाही, असा रोखठोक सवाल करत, महापौर बंगल्यात बाळासाहेबांचे स्मारक बनविण्यास मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कडाडून विरोध केला.
शिवसेना-भाजपची आज मुंबईत, राज्यात आणि देशात सत्ता असताना बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी मोठी जागा का मिळू शकत नाही, असा कडवट सवालही राज यांनी शिवाजी पार्क येथील कृष्णभुवन या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत केला. महापौर बंगला हा मुंबईच्या मुंबईच्या प्रथम नागरिकाचे निवासस्थान असून त्या वास्तूला ऐतिहासिक वारसा (हेरिटेज) वास्तूचा दर्जा आहे. शिवसेनेचा या जागेवर डोळा असल्यामुळेच त्यांनी येथे स्मारक करण्याचा घाट घातला असून उद्या याच पद्धतीने मुख्यमंत्र्यांचे वर्षां निवासस्थान, राज्यपालांचे राजभवन आणि राष्ट्रपतींच्या निवासस्थानी स्मारके बनविली जातील का, असा सवालही त्यांनी केला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मनात आले तर उद्या वर्षां बंगल्यावरही एखादे स्मारक बनवून मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान अन्यत्र हलविणार का, असा टोलाही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला. बाळासाहेबांसारख्या महान व्यक्तीचे स्मारकही त्यांच्या उंचीला साजेसे असेच झाले पाहिजे असे सांगून याप्रकरणी आपली भूमिका मांडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राजकीय नेत्यांच्या संस्थांना हव्या तेवढय़ा जागा मिळतात. अल्पसंख्यांकांच्या संस्थाना जागा मिळतात, अनेकदा बिल्डरांच्या भल्यासाठी आरक्षणे बदलली जातात मग शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी स्वतंत्र जागा यांना सत्ता असूनही का देता येत नाही असा सवाल राज यांनी केला.

इंदु मिलमध्ये जगातील सर्वात मोठे वाचनालय असले पाहिजे अशी संकल्पना सर्वात प्रथम मी मांडली. बाबासाहेबांचे विचार यातून खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत अशी भूमिका यामागे होती, असेही राज यांनी या वेळी स्पष्ट केले.