साप्ताहिक विवेकचे माजी संपादक, हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष आणि सामाजिक समरसता चळवळीचे अग्रणी रमेश पतंगे यांचा अमृत महोत्सव सोमवार, १५ फेब्रुवारी रोजी रवींद्र नाटय़ मंदिर प्रभादेवी येथे सायंकाळी सहा वाजता साजरा होणार आहे. यानिमित्ताने रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होईल. तसेच रमेश पतंगे यांच्यावरील गौरव ग्रंथ ‘नंदादीप’चे प्रकाशनही या वेळी होईल. समरसता विषय विकसित होत गेला. तो सार्वजनिक झाला, हे पतंगे यांचे श्रेय, असे सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुरेश हावरे यांनी नमूद केले.

या सत्कार समारंभानिमित्त रमेश पतंगे यांचे स्नेही डॉ. सुरेश हावरे म्हणाले, ‘मराठवाडा विद्यापीठ नामांतर, ‘रीडल्स ऑफ राम’ इत्यादी विषयांत समरसता मंचाची पर्यायाने रमेश पतंगेंची भूमिका मोलाची ठरली. महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयांवरून कायम संघाला लक्ष्य केले जायचे. असा तो काळ होता. हळूहळू समरसता विषय विकसित होत गेला. तो सार्वजनिक झाला, हे पतंगे यांचे श्रेय,’ असे हावरे यांनी नमूद केले.

नागपूरच्या मोहिते वाडय़ावरील शाखेत रमेश पतंगे यांचा बौद्धिक वर्ग झाला. त्या वर्गाला रा. स्व. संघाचे तिसरे सरसंघचालक बाळासाहेब देवरस श्रोता म्हणून उपस्थित होते. त्यांनी बौद्धिक वर्ग चांगला झाल्याबद्दल रमेश पतंगे यांचे कौतुक केले होते अशी पतंगे यांची आठवण हावरे यांनी सांगितली.

पतंगे यांच्यामुळेच समरसता विषय राष्ट्रव्यापी

समरसता अध्ययन केंद्र ही रमेश पतंगे आणि मधुभाई कुळकर्णी यांची संकल्पना. ही एक अनोखी अखिल भारतीय संघटना. विभिन्न सामाजिक विषयांचे अध्ययन, संशोधन व अभिसरण ही संस्था करते. याअंतर्गत डॉ. आंबेडकर विमर्श, स्वामी विवेकानंद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारदर्शन, अनुसूचित जाती- सामाजिक वास्तव, भारतीय संविधानाचे अंतरंग अशा अनेक विषयांवर कार्यशाळा-परिसंवाद देशभर झाल्या. पतंगे यांच्यामुळेच समरसता हा विषय आता राष्ट्रव्यापी झाला आणि ते त्या विषयाचे खऱ्या अर्थाने प्रवक्ते झाले आहेत.           – डॉ. सुरेश हावरे