मुंबई : मुंबईतील जीर्ण झालेले पूल पाडून त्याजागी मजबूत पूल बांधले जात आहेत. तसेच पूर्वीच्या चिंचोळ्या पुलाच्या जागी प्रशस्त पूल बांधला जात आहे. सध्या रे रोड स्थानकालगतच्या उड्डाणपुलाचे काम वेगात सुरू आहे. आतापर्यंत या पुलाचे ७० टक्के काम पूर्ण झाले असून मे अखेरीस पुलाचे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे भायखळा व या परिसरातील रहदारी वेगवान होण्यास मदत होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दक्षिण मुंबईतील अनेक जुन्या परिसरांतील रस्ते अरूंद आहेत. अनधिकृत फेरीवाले, अनधिकृत बांधकामे, रस्त्यावर उभी केली जाणारी वाहने यांमुळे रस्ते अधिकच आक्रसतात. त्यातच विकासकामांमुळे रस्त्यांवर खोदकामे केली जातात. परिणामी मुंबईतील वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठा आहे. ब्रिटिशकालीन उड्डाणपुलाची सद्यस्थिती दयनीय आहे. अंधेरी स्थानकाजवळील गोखले उड्डाणपुलाच्या दुर्घटनेनंतर रेल्वे मार्गावरुन जाणाऱ्या सर्व पुलांची आयआयटीमार्फत संरचनात्मक तपासणी केली. त्यात धोकादायक पुलाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला. ब्रिटिशकालीन असलेला रे रोड येथील पूल पाडून तेथे नवा प्रशस्त पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. फेब्रुवारी २०२२ रोजी महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून (महारेल-एआरआयडीसी) रे रोड केबल स्टेड पूल बांधण्याचे काम हाती घेण्यात आले. पुलाच्या पायाभरणीचे सर्व काम पूर्ण झाले आहे. तसेच तुळया (गर्डर) उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या पुलाची संपूर्ण बांधकाम ७० टक्के पूर्ण झाले असून मे २०२४ रोजी या पुलाचे काम पूर्ण होईल. मार्च महिन्यात हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेऊन पुढील कामे केली जातील, अशी माहिती महारेलकडून देण्यात आली.

हेही वाचा – बोरिवली रेल्वे गोळीबार प्रकरणः बडतर्फ आरपीएफ जवान चेतन सिंहविरोधात अतिरिक्त पुरावे सादर

– रे रोड उड्डाणपूल हा रे रोड स्थानकाला लागून असल्याने, त्यावरून प्रवासी आणि पादचाऱ्यांना प्रवास करणे सोयीस्कर होईल.

– पुलाच्या खांबाची संख्या कमी करण्यासाठी केबल स्टेड पुलाचा वापर केला आहे.

– बॅरिस्टर नाथ पै मार्गावरील वाहतूक नव्या पुलाच्या खालून जाणे शक्य होईल.

– महारेलकडून या पुलावर आकर्षित विद्युत दिव्यांची रोषणाई करून पुलावर ‘सेल्फी पाॅंईट’ देखील उभा केला जाणार आहे.

हेही वाचा – विषारी अन्नपदार्थ खाऊन पवईत तीन श्वानांचा मृत्यू- आज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा

रे रोड उड्डाणपुलाची वैशिष्ट्ये

– लांबी ३८५ मीटर

– रुंदी २५.५ मीटर

– एकूण ६ मार्गिका

– दोन रॅम्प

– अपेक्षित प्रकल्प खर्च १४५ कोटी

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ray road flyover to be completed by may mumbai print news ssb