लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : केईएम रुग्णालयात मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येत असून रुग्णांना केस पेपरसाठी जास्त प्रतीक्षा करावी लागू नये यासाठी बाह्यरुग्ण खिडकीजवळ अधिक मनुष्यबळ नियुक्त करावे, असे निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत.
केईएम रुग्णालयाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त करण्यात येत असलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी, तसेच रुग्णालयातील पुनर्विकास प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी भूषण गगराणी यांनी रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट दिली. रुग्णालयातील विविध विभागांनाही त्यांनी भेटी दिली. याप्रसंगी बाह्यरुग्ण खिडकीजवळील रुग्णांशी संवाद साधताना त्यांनी केस पेपर संदर्भातील निर्देश दिले. यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, तसेच विविध विभागांतील अधिकारी उपस्थित होते.
आणखी वाचा-नोटीशीनंतरही महाकाय जाहिरात फलक कायम; पालिकेच्या नियमावलीस मध्य, पश्चिम रेल्वे प्रशासनाचा हरताळ
केईएम रुग्णालयात शतक महोत्सवी वर्षानिमित्त तयारीचा गगराणी यांनी आढावा घेतला. शतक महोत्सवी वर्षानिमित्त रुग्णालयात जानेवारी २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शतक महोत्सवी वर्षानिमित्त या उपक्रमांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या संपूर्ण प्रशासनाने सहभागी व्हावे, अशी सूचना करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. केईएम रुग्णालयाच्या पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत नवीन इमारतींचे बांधकाम प्रगतीपथावर आहेत. त्यामध्ये सर्व्हिस टॉवर, कर्मचारी भवन, परिचारिका वसतिगृह या इमारतीचे बांधकाम वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश गगराणी यांनी दिले. रुग्णालयाची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रमवारी अधिक उंचावण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.