मुंबई : मुंबईतील कुलाबा येथील १६५ वर्ष जुन्या ऐतिहासिक अफगाण वॉर मेमोरियल चर्चचे नूतनीकरण पूर्ण झाले असून येत्या ३ मार्चपासून ते सर्वांसाठी खुले होणार आहे. मार्च २०२२ मध्ये या चर्चच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. ४० ते ५० कुशल कामगार व तज्ज्ञांच्या अथक मेहनतीनंतर नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून चर्चला नवी झळाळी मिळाली आहे. या चर्चच्या नूतनीकरणासाठी एकूण १४ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

वर्ल्ड मोन्युमेंट्स फंड इंडियाने (डब्ल्यूएमएफआय) सिटीकडून (सीआयटीआय) मिळालेल्या निधीच्या माध्यमातून आणि अफगाण वॉर मेमोरियल चर्चची पास्टोरेट समिती आणि कस्टोडियनच्या सहकार्याने नूतनीकरणाचे काम पूर्ण केले. चर्चचे छप्पर, विद्युत दिवे, लाकडी बाके व खुर्च्या, जमिनीचा भाग, चर्चबाहेरील संकुलाचे नूतनीकरण करण्यात आले आहे.

हेही वाचा >>>उपमुख्यमंत्री फडणवीस यांना समाज माध्यमांवर ठार मारण्याची धमकी, सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

‘अफगाण वॉर मेमोरियल चर्चच्या नूतनीकरणासाठी सर्वप्रथम आम्ही संपूर्ण चर्चच्या परिसराची तपासणी करून दस्तऐवजीकरण केले. विविध तज्ज्ञांनीही बारकाईने लक्ष देऊन चर्चची पाहणी केली. चर्चच्या मूळ वास्तूला आणि सौंदर्याला धक्का न लागता नवी झळाळी कशी देता येईल, यावर आम्ही भर दिला. विविध साहित्याचा वापर करून हे चर्च बांधण्यात आले आहे, त्यामुळे सुरुवातीला संबंधित कुशल कारागिरांचा शोध घेऊन त्यांना एकत्र आणण्यात आले’, असे नूतनीकरण प्रकल्पाच्या संचालक सिद्धी पोतदार यांनी सांगितले. तर ‘अफगाण चर्च हे भारतातील चर्चच्या वास्तुकलेतील एक उल्लेखनीय रत्न आहे’, असे मत जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि वर्ल्ड मोन्युमेंट्स फंड इंडियाच्या बोर्ड सदस्य संगीता जिंदाल यांनी व्यक्त केले.

हेही वाचा >>>संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दोन नवीन पक्ष्यांची नोंद; पांढरा गाल असलेला तांबट,पिवळा बल्गुलीचे दर्शन

अफगाण वॉर मेमोरियल चर्चचा इतिहास

अफगाण वॉर मेमोरियल चर्च हे १८४७ ते १८५८ च्या दरम्यान व्हिक्टोरियन गॉथिक शैलीत बांधण्यात आले. या चर्चला श्रेणी १ हेरिटेज वास्तूचा दर्जाही प्राप्त आहे. सुरुवातीला गॅरिसन चर्च म्हणून प्रसिद्ध असलेल्या या चर्चचे ‘ब्राइड्स चर्च’ असे नाव होते. हेन्री कोनीबियर यांनी डिझाइन केलेले अफगाण चर्च हे बॉम्बे आर्मी, मद्रास आर्मी, बंगाल आर्मी व एचएम आर्मी आणि पहिले अँग्लो-अफगाण युद्ध (१८३८-१९४०) व दुसऱ्या अँग्लो-अफगाण युद्धामध्ये (१८७८-१८८०) मृत पावलेल्या ४ हजार ५०० सैनिक आणि त्यांच्या छावणीतील १२ हजार अनुयायांचा सन्मान करण्यासाठी ब्रिटिश सरकारने निश्चित केलेल्या जमिनीवर बांधण्यात आले.

चर्चची वैशिष्ट्ये

अफगाण वॉर मेमोरियल चर्चचा परिसर हा २० हजार चौरस फुटांचा आहे. तर चर्च हे ६ हजार चौरस फुटांमध्ये मध्यभागी वसलेले आहे. चर्चची उंची ही ३२ मीटर आणि बेल टॉवरची उंची ही ६० मीटर म्हणजेच तब्बल २०० फूट असून तिथे एकूण ८ बेल आहेत. मेमोरियल टॅब्लेट आणि प्रतिकात्मक स्टेन्ड काचेच्या खिडक्या या चर्चचे महत्व दर्शवितात. तसेच अल्टर, चॅन्सेल, मेन वेस्टिब्युल, लँडस्केपमधील वॉर मेमोरियल्स आणि ताबूतांमधील ध्वज हे ऐतिहासिक घटनांची आठवण करून देत सखोल माहिती देतात. या चर्चमधील खुर्ची आणि बाकांसाठी साग आणि शिसमचे लाकूड वापरण्यात आले आहे. तसेच बांधकामासाठी पोरबंदर दगड वापरण्यात आला होता.