मुंबई : बॉम्बे नॅचरल सोसायटीने बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पक्षी गणना सुरू केली असून या पक्षी गणनेदरम्यान राष्ट्रीय उद्यानात पांढरा गाल असलेला तांबट (व्हाईट चिक्ड बार्बेट), पिवळा बल्गुली (इंडियन यलो टिट) या दोन पक्ष्यांचे दर्शन झाले.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पक्षी निरिक्षण सुरु असून ते दीर्घकाळ सुरू राहणार आहे. या मोहिमेत प्रत्येक ऋतुमध्ये दिसणाऱ्या पक्ष्यांची नोंद करण्यात येत आहे. याच मोहिमेदरम्यान उद्यानातील पक्ष्यांच्या नोंदीत दोन नव्या पक्ष्यांची भर पडली. हे दोन्ही पक्षी स्थलांतरित आहेत. पिवळा बल्गुली हा पक्षी मूळत: बांग्लादेश, पाकिस्तान,नेपाळ आणि भूतान या भागात आढळतात. उष्ण कटिबंधीय जंगलात आढळणाऱ्या या पक्ष्याची लांबी १५ सेमी आहे. नराचे कपाळ, गालावर ठिपके आणि खालचा भाग पिवळ्या रंगाचा असतो, तर मादी नरापेक्षा आकाराने किंचित लहान, पाठीचा भाग हिरवा असतो. पिवळा बल्गुली नोहमी रुंद झाडांवर वास्तव्य करतात, तसेच एप्रिल महिना हा त्यांचा प्रजनन काळ असतो.

हेही वाचा >>>मुंबई : तेजस एक्स्प्रेसमध्ये मराठीचे वावडे

दरम्यान, काही वर्षांपूर्वी पिवळा बिल्गुलाची मोठ्या प्रमाणावर निर्यात करण्यात येत होती. त्यासाठी मोठ्या संख्येने पिवळा बिल्गुलांना पकडण्यात येत होते. या पक्ष्याचा अधिवास आता राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्यामध्ये आढळतो. पांढरा गाल असलेला तांबट पक्षी प्रामुख्याने पश्चिम घाटातील जंगलात आढळतो. त्याचे डोके तपकिरी, पांढऱ्या रंगाचे असते. डिसेंबर ते जुलै हा त्यांचा प्रजनन हंगाम असतो. फळ, फळभाज्या आणि कीटक हे त्यांचे खाद्य.

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने हाती घेतलेल्या पक्षी गणनेमध्ये ५० स्वयंसेवकांच्या मदतीने पक्ष्यांची नोंद करण्यात येत आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे डॉ. राजू कसंबे आणि डॉ. आसिफ खान, तसेच मुख्य वनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन, सहाय्यक वनसंरक्षक सुधीर सोनावले यांच्या सहकार्याने ही पक्षी गणना करण्यात येत आहे.