आरपीएफच्या जवानांची रेल्वे मार्गावर गस्त

रेल्वेरूळ ओलांडताना होणारे अपघात रोखण्यासाठी उपाय

रेल्वेरूळ ओलांडताना होणारे अपघात रोखण्यासाठी उपाय

रेल्वे प्रशासन, रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलीस यांनी अनेकदा आवाहन करूनही केवळ आयुष्यातील काही मिनिटे वाचवण्याच्या नादात रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या मुंबईकरांपायी आता रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना आपला जीव धोक्यात टाकावा लागणार आहे. दोन स्थानकांदरम्यानच्या भागातून रेल्वेरूळ ओलांडणाऱ्या लोकांना परावृत्त करण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना आता रेल्वे रुळांच्या बाजूला ‘ऑन डय़ुटी’ उभे राहावे लागणार आहे. याबाबतचे आदेश रेल्वे सुरक्षा दलाच्या महासंचालकांनी दिले आहेत.

मुंबईच्या उपनगरीय रेल्वेमार्गावर दर दिवशी सरासरी दहा जण मृत्युमुखी पडतात. यापैकी निम्मे मृत्यू रेल्वेरूळ ओलांडताना घडतात, असे आकडेवारी सांगते. यापैकी एखाद्या स्थानकात दोन फलटादरम्यानचे रेल्वेरूळ ओलांडताना अपघात होण्याचे प्रमाण नगण्य आहे. दोन स्थानकांदरम्यान रेल्वेमार्गावरून रूळ ओलांडणारे प्रवासी या अपघातांमध्ये बळी पडत असल्याचे लोहमार्ग पोलीस सांगतात. आता या अपघातांवर आळा घालण्याची जबाबदारी रेल्वे सुरक्षा दलावर आली आहे.

रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालक एस. के. भगत शनिवारी याप्रकरणी लक्ष घालण्यासाठी दिल्लीहून मुंबईत आले होते. मध्य रेल्वेवर सीएसटी ते कर्जत यांदरम्यान उपनगरीय गाडीने प्रवास करत त्यांनी अपघाताची कारणेही जाणून घेतली. सर्वाधिक अपघात रूळ ओलांडताना होत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी रूळ ओलांडण्याची ठिकाणे नोंदवून त्या ठिकाणी रेल्वे सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता मध्य व पश्चिम रेल्वेवरील अपघातांसाठी संवेदनशील मानल्या जाणाऱ्या ठिकाणी रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांचा पहारा लागणार आहे.

संवेदनशील ठिकाणे

गोरेगाव-जोगेश्वरी, ठाणे-कळवा यांदरम्यान विटाव्याजवळ, ठाकुर्लीजवळ, सँडहर्स्ट रोड स्थानकाजवळ, खार स्थानकाजवळ, अंधेरी-विलेपार्ले यांदरम्यान, कुर्ला स्थानक, चेंबूर-गोवंडीदरम्यान.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Reserve police force patrolling at railway station

ताज्या बातम्या