‘राइट टू पी’ मोहिमेशी पुरुषांनाही जोडून घेण्याचा अनोखा प्रयत्न
सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी पुरेशी स्वच्छतागृहे उपलब्ध व्हायला हवीत, या मागणीसाठी गेली काही वर्षे सातत्याने प्रयत्न करणाऱ्या ‘राइट टू पी’ मोहिमेत आता पुरुषांनाही सामील करून घेतले जाणार आहे. पुरुषांना उघडय़ावर मोकळे होता येते. मात्र पुरेशी स्वच्छतागृहे असती तर त्यांनी उघडय़ावर लघुशंका करण्याचा मार्ग स्वीकारला नसता, याचे भान पुरुषांना आणि प्रशासनालाही आले पाहिजे. या उद्देशाने ‘मोकळे व्हा पण हक्काच्या जागेवर’ असे आवाहन पुरुषांना करण्यात येत आहे.
‘जागतिक महिला दिना’च्या पूर्वसंध्येला चेंबूरमधील पूर्व विभागात ‘राइट टू पी’च्या कार्यकर्त्यांनी पुरुष जिथे जिथे उघडय़ावर लघुशंका उरकतात त्या ठिकाणी ‘मोक ळे व्हा पण हक्काच्या जागेवर’ असा संदेश देणारी पोस्टर्स लावायला सुरुवात केली. ‘राइट टू पी’ मोहिमेतील आमच्या महिला फेडरेशनच्या कार्यकर्त्यां एकत्रित येऊन पोस्टर्स लावतो आहोत. पुरुष कार्यकर्त्यांच्या बरोबरीनेच आम्ही हे काम करतो आहोत.
आम्हाला असे जाहीर पोस्टर्स लावताना पाहून साहजिकच बघ्यांच्या मनात उत्सुकता आहे. सातत्याने स्वच्छतागृहांचा प्रश्न धसास लावूनसुद्धा ढिम्म असलेल्या प्रशासनाचे लक्ष याकडे वेधणे गरजेचे होते.
सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे ही के वळ महिलांचीच नाही तर पुरुषांचीही गरज आहे, हे आम्हाला या उपक्रमाच्या माध्यमातून लक्षात आणून द्यायचे आहे, असे ‘राइट टू पी’च्या कार्यकर्त्यां मुमताज शेख यांनी सांगितले. मुळात, पुरुषांना उघडय़ावर मोकळे होता येते. पण पुरेशा मुताऱ्या नसल्यामुळेच त्यांना उघडय़ावर मोकळे व्हावे लागते, याचा प्रशासनाबरोबरच पुरुषांनीही संवेदनशीलतेने विचार करण्याची गरज आहे.
केवळ उपकाराच्या वृत्तीने पुरुषांनी या मोहिमेत सहभागी न होता हक्काच्या लढाईसाठी ते यात उतरले पाहिजेत. स्वच्छतागृहे ही दोघांची गरज आहे हे त्यांच्या लक्षात आले तर एकत्रित येऊन ‘राइट टू पी’ची मोहीम अधिक बळकट करता येईल.
प्रशासनावर यासाठी दबाव निर्माण करता येईल, या विचाराने ‘मोकळे व्हा पण हक्काच्या जागेवर’ हा नवीन विचार पुढे नेण्यात येतो आहे. पुढचे तीन दिवस शहरातील विविध भागांमध्ये हे पोस्टर्स लावण्याचे काम सुरू राहील, अशी माहिती मुमताज शेख यांनी दिली.