फुटबॉल खेळणारे, गप्पा मारणारे, लहान मुलांचे बोबडे बोल बोलणारे, वार्धक्याने ग्रस्त नागरिकांचे मनोरंजन करणारे असे नानाविविध रोबो, बॅटरीवर चालणारी आणि स्वत:हूनच तोल सावरणारी एकचाकी सायकल, नाचणारा बॉल अशा एकापेक्षा एक भन्नाट गोष्टी तीन जानेवारीपासून सुरू होणाऱ्या पवईच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’मध्ये अनुभवायला मिळणार आहेत.
‘टेकफेस्ट’ या ‘आयआयटी’च्या तंत्र महोत्सवात अनेक देशी-विदेशी बनावटीच्या रोबोंचे प्रदर्शन भरणार आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जागतिक पातळीवर नेमके काय घडत आहे, याची चुणूक या प्रदर्शनाच्या निमित्ताने पाहायला मिळेल. त्यात गप्पा मारणाऱ्या ‘बिना ४८’, फुटबॉल खेळणाऱ्या ‘फ्युमानाईड’, वृद्धांची काळजी घेणारा ‘जॅक अॅण्ड मटिल्डा’ आधी अफलातून रोबोंबरोबरच प्रयोग शाळेत, युद्धात आदी विविध ठिकाणी वापरले जाणारे ‘रोबो’ असणार आहेत. इतकेच नव्हे तर मानवी भावना ओळखणारे आणि त्यानुसार प्रतिसाद देणारे रोबो आंतराष्ट्रीय प्रदर्शनामध्ये पाहता येतील. अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, जपान, इस्त्रायल आदी विविध देशांमध्ये हे रोबो तयार करण्यात आले आहेत.
बिना ४८ – अमेरिकी बनावटीचा हा जगातील सर्वाधिक ‘शास्त्रशुद्ध’ असा ‘सोशल रोबो’ समजला जातो. हा रोबो रेडिओ जॉकीप्रमाणे गप्पा मारतो. माहिती, आठवणी, मूल्ये आणि विश्वास यांच्या आधारे अगदी मानवी पातळीवर येऊन संवाद साधणारा रोबो अशी याची ख्याती आहे.
नाओ – हा रोबो एक वर्षांच्या लहान मुलांच्या बोलण्याची, रडण्याची नक्कल करतो. लहान मुलांशी ज्या पद्धतीने वागतो त्या पद्धतीने याच्याशी वागल्यास तो त्या प्रमाणे प्रतिसाद देतो.
जॅक अॅण्ड मटिल्डा – हा ऑस्ट्रेलियातील विद्यापीठात शिकविणाऱ्या राजीव खोसला या भारतीय वंशाच्या प्राध्यापकांनी तयार केला आहे. हा वृद्धाच्या एकाकी आयुष्यात हसू फुलविणारा असा रोबो आहे. हा त्यांच्याशी बोलतो, नाचतो, गातो, खेळतो, वर्तमानपत्र वाचून दाखवितो.
फ्युमानाईड – हा रोबो जर्मनीच्या बर्लिन विद्यापीठात तयार केला गेला आहे. तो फुटबॉल खेळतो. एखाद्या कसलेल्या फुटबॉलपटूप्रमाणे बॉल अडविणे, चालणे, उठून उभे राहणे, लाथ मारणे, नाचणे आदी क्रिया हा रोबो करतो.
साऊंड बॉटल – जपानमध्ये तयार करण्यात आलेले हे बाटलीच्या आकाराचे उपकरण गाणे रेकॉर्ड करते आणि पुन्हा ऐकवून दाखविते. संगीताची एका वेगळ्या प्रकारची अनुभूती या उपकरणाच्या माध्यमातून मिळते.
होव्हीस इको – हा रोबो व्यायाम, नृत्य अशा तब्बल पाच हजार वेगवेगळ्या क्रिया करतो. हा जगातील सर्वात मानवी असा रोबो म्हणून ओळखला जातो.
सोलोव्हील – बॅटरीवर चालणारा हा एकचाकी सायकलसदृश रोबो स्वत:चा तोल स्वत:च सावरतो. एका व्यक्तीला एका जागेहून दुसऱ्या जागी जाण्यास याचा उपयोग होतो.