मुंबई : निवडणुकांच्या सुरुवातीला भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हवा तयार केली होती. प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया सुरू झाली तेव्हा जनमानस विरोधात जात असल्याची जाणीव भाजपला झाली. त्यामुळेच मोदींनी विखारी, धार्मिक, वैयक्तिक पातळीवर प्रचार आणि हल्ले सुरू केले. त्यातूनच ते अधिकच खोलात गेले, असे निरीक्षण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘लोकसत्ता लोकसंवाद’ कार्यक्रमात शनिवारी नोंदविले. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते भाजपबरोबर गेले असले तरी सामान्य कार्यकर्ते मूळ पक्षाबरोबरच आहेत, असा दावा त्यांनी केला.
राष्ट्रवादीमध्ये पडलेली फूट, अजित पवार आणि प्रफुल पटेल यांनी प्रचाराच्या दरम्यान केलेले दावे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरील संबंध, इंडिया आघाडीची भविष्यातील राजकीय रणनीती, ‘आप’ला मिळणारा प्रतिसाद अशा विविध प्रश्नांवर पवारांनी ‘लोकसत्ता लोकसंवाद’ कार्यक्रमात मनमोकळेपणाने उत्तरे दिली. सातपैकी चार टप्प्यांमधील मतदान प्रक्रिया पार पडल्यावर मोदींना मिळणारा प्रतिसाद कमी झाल्याचे जाणवत आहे. विशेषत: शेतकरी आणि तरुण वर्ग भाजपच्या विरोधात गेला आहे. हे मोदींच्याही निदर्शनास आले आहे. यामुळेच हिंदू-मुस्लीम असा प्रचाराला धार्मिक रंग दिला. ‘भटकती आत्मा’, ‘नकली शिवसेना’ असा वैयक्तिक पातळीवर मी किंवा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ले चढविण्यास सुरुवात केली. ‘ही सारी भाजपची पीछेहाट होत असल्याची लक्षणे आहेत’, असे मत पवारांनी व्यक्त केले. वैयक्तिक हल्ल्यांची मला चांगली सवय आहे. अण्णा हजारे, गो. रा. खैरनार यांनी माझ्यावर किती आरोप केले. आज अण्णा हजारे आहेत कुठे ? वैयक्तिक आरोप केले तरी मतदार तेवढे गांभीर्याने घेत नाहीत, असा अनुभव त्यांनी कथन केला.
हेही वाचा >>> ‘महाविकास आघाडी’चा पहिला प्रयत्न २०१४ साली…
अजित पवारांच्या बंडाचा घटनाक्रम उलगडताना पवारांनी, सत्ताधारी पक्षाबरोबर गेले पाहिजे ही राष्ट्रवादीच्या काही नेत्यांमध्ये भावना होती. हे पाच वर्षे सत्तेविना होते. पुन्हा विरोधात बसण्याची या नेतेमंडळींची मानसिकता नव्हती. याशिवाय काही नेतेमंडळींच्या मनात तुरुंगात जावे लागेल अशी भीती होती. माझ्याशी या नेत्यांनी चर्चा केली होती. तुम्हाला वेगळा मार्ग स्वीकारायचा असेल तर जरूर जा, पण मी तुमच्या बरोबर येणार नाही हे आधीच स्पष्ट केले होते, असे पवारांनी सांगितले.
अजित पवार यांची ओरड निरर्थक
राष्ट्रवादीत माझ्यावर अन्याय झाला अशी भावना अजित पवार आता व्यक्त करीत आहेत. ‘मी शरद पवारांच्या पोटी जन्माला आलो असतो तर’ वगैरे भाषा करीत आहेत. कुटुंबप्रमुख म्हणून मुलगी सुप्रिया आणि पुतण्या अजित यांच्यात कधीही भेद केला नाही. अजित पवारांना पक्षाने काय कमी दिले ? उपमुख्यमंत्रीपद, मंत्रीपद, विरोधी पक्षनेतेपद अशी विविध पदे दिली. सुप्रिया सुळे या चार वेळा लोकसभेवर निवडून आल्या आहेत. त्यांचे कार्यक्षेत्र लोकसभेपुरतेच सीमित होते. विधिमंडळ पक्षनेते म्हणून अजित पवारांकडे साऱ्या राज्याची सूत्रे होती. एवढे सारे होऊनही पक्षात मला काम करण्यास संधी मिळाली नाही ही अजित पवारांची ओरड निरर्थक आहे, असे पवारांनी सुनावले.
राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फूट पडली असली तरी दोन्ही पक्षांमधील नेतेमंडळी बाहेर गेली पण सामान्य कार्यकर्ते मूळ पक्षाबरोबरच आहेत. उद्धव ठाकरे यांच्याबाबत तर हे अधिक जाणवते. प्रचारासाठी राज्यभर दौरे केले तेव्हा कार्यकर्ते बरोबर असल्याचे लक्षात आले. नेतेमंडळी गेली असली तरी आम्ही नवीन कार्यकर्त्यांकडे नेतृत्व सोपविले. त्याचे परिणाम दिसू लागले आहेत, असे पवार यांनी सांगितले.
प्रफुल्ल पटेल भाजपबरोबर जाण्यास आग्रही
२००४ पासूनच प्रफुल्ल पटेल भाजपबरोबर जाण्यासाठी आग्रही होते. ‘मी काही राजकीय चुका केल्या’, असे प्रफुल्ल पटेल म्हणतात. पण भाजपने २००४च्या निवडणुकीत ‘इंडिया शायनिंग’चा प्रचार सुरू केला तेव्हापासूनच प्रफुल्ल पटेल हे भाजपबरोबर जाण्यासाठी माझ्याकडे आग्रही होते. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दल आदर असला तरी मते मिळणार नाहीत हे मी त्यांना वारंवार सांगत होतो. पाहिजे तर तुम्ही जा हे मी त्यांना सांगितले तेव्हा पटेल यांच्या डोळ्यात पाणी आले होते, असा अनुभव पवार यांनी सांगितला. शेवटी मी सांगत होतो तसाच निकाल लागला. काँग्रेसबरोबर जाण्यास प्रफुल्ल पटेल यांनी विरोध केला तरीही यूपीए सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या वतीने मी त्यांच्याकडे नागरी हवाई उड्डाण खाते सोपविले होते हे पवारांनी आवर्जून सांगितले.
मुख्यमंत्रीपदासाठी कोणीही योग्य नेता नव्हता
२००४ मध्ये सर्वाधिक आमदार निवडून येऊनही राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाची संधी घालविली, अशी टीका केली जाते याकडे लक्ष वेधले असता पवार म्हणाले की, तो निर्णय फार विचारपूर्वक घेण्यात आला होता. तेव्हा अजित पवारांकडे मुख्यमंत्रीपद सोपविण्याचा प्रश्नच नव्हता. कारण ते फारच नवखे होते. मुख्यमंत्रीपदासाठी कोणी योग्य नेता आमच्याकडे नव्हता. छगन भुजबळ यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपविले असते तर भविष्यात पक्षात फूट पडली असती. यामुळेच अधिकची मंत्रिपदे व खाती मिळवून मुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे कायम ठेवण्याच्या निर्णयावर आम्ही आलो.
विलीनीकरणाचा पर्याय
छोट्या पक्षांच्या काँग्रेसमधील विलीनीकरणाचा मी मुद्दा मांडताच बरीच चर्चा झाली. अनेक पक्ष काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या नेत्यांनी स्थापन केले आहेत. या पक्षाचा एखादा खासदार वा दोन-चार आमदार आहेत. स्वतंत्र अस्तित्व ठेवण्यापेक्षा या पक्षांचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण करता येईल, अशी भूमिका मी मांडली होती, असे पवारांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार का, या प्रश्नावर आता तरी विचार नाही. पुढे त्याज्य नाही, असे सांगत पवारांनी हा पर्याय खुला असल्याचे संकेत दिले.
मोदींना तेव्हा मदत केली होती
काँग्रेसप्रणीत संयुक्त लोकशाही आघाडीचे सरकार असताना काँग्रेसचे काही मंत्री आणि गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यात कमालीची कटुता निर्माण झाली होती. तेव्हा गुजरातशी संबंधित प्रश्नांच्या संदर्भात मोदी नवी दिल्लीतील माझ्या निवासस्थानी नेहमी येत असत. गुजरातमधील शेती व अन्य प्रश्नांच्या संदर्भात मी तेव्हा मोदी यांना मदत करीत असे. त्यातून काँग्रेसच्या मंत्र्यांची मी नाराजीही ओढवून घेतली होती. मोदी यांना तेव्हा अमेरिकेने व्हिसा नाकारला होता. मी इस्रायलला जाणार याची माहिती त्यांना कळताच त्यांनी सरकारी शिष्टमंडळात त्यांचा समावेश करावा म्हणून विनंती केली होती. त्यानुसार मोदी व राजस्थानच्या तत्कालीन मुख्यमंत्री वसुंधराराजे यांचा दौऱ्यात समावेश केला होता. त्यातूनच माझे बोट पकडून राजकारणात आलो वगैरे मोदी सांगतात पण त्यात काही तथ्य नाही.
एवढी मदत करूनही मोदी यांनी राष्ट्रवादीतील फूट टाळण्यासाठी मदत केली नाही का, या प्रश्नावर उलट त्यांनी दरी वाढविण्यासाठी हातभारच लावला, असा टोला पवारांनी लगावला.
‘प्रफुल पटेल २००४ पासूनच भाजपबरोबर जाण्यास आग्रही’
प्रफुल पटेल २००४ पासूनच भाजपबरोबर जाण्यासाठी आग्रही होते. मी काही राजकीय चुका केल्या, असे ते म्हणतात, पण भाजपने २००४च्या निवडणुकीत ‘इंडिया शायनिंग’चा प्रचार सुरू केला तेव्हापासूनच पटेल भाजपबरोबर जाण्यासाठी माझ्याकडे आग्रही होते, असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला.
●रा. स्व. संघाबद्दल भाजप अध्यक्ष नड्ड़ा यांनी व्यक्त केलेल्या विधानावरून भाजपला आता संघाची आवश्यकता राहिलेली नाही हेच सिद्ध होते.
●राज ठाकरे यांच्यातील आक्रमकपणा कमी झालेला, भाषा बदललेली जाणवली.
●महाराष्ट्रातील औद्याोगिक वातावरण खराब झाले आहे.
●निवडणूक आयोगाच्या निष्पक्षपातीपणाबद्दल प्रश्नचिन्ह.
●राज्याचे सामाजिक वातावरण बिघडत आहे हे चिंताजनक.
●सत्ताधारी पक्षांकडून पैशांचा महापूर.●अजित पवारांकडे साऱ्या राज्याची सूत्रे होती. एवढे सारे होऊनही पक्षात काम करण्यास संधी मिळाली नाही ही ओरड निरर्थक आहे.