मराठा आरक्षण म्हणजे नव्या रॅपरमध्ये तेच चॉकलेट देण्यात आल्याची प्रतिक्रिया आरक्षण विधेयक मंजूर झाल्यावर नितेश राणे यांनी दिली आहे. मराठा आरक्षणासंदर्भातला राणे समितीने दिलेला अहवाल उच्च न्यायालयाने रद्द केला नव्हता तर त्यावेळी सरकारने हायकोर्टात बाजू योग्य पद्धतीने मांडली नव्हती असाही आरोप नितेश राणे यांनी केला आहे. एवढंच नाही तर मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर त्यांनी ते संघर्ष करून मिळवलं असाही ट्विट नितेश राणे यांनी केला आहे.

मराठा आरक्षण विधेयक विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात कोणत्याही चर्चेशिवाय एकमताने मंजूर झाले. विरोधकांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला. आता हे विधेयक राज्यपालांकडे पाठवले जाईल. राज्यपालांची मंजुरी मिळाल्यानंतर आरक्षणाचा कायदा लागू होईल. मराठा समाजाच्या आरक्षणाचे स्वागत आहे. मात्र आरक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांना न्याय मिळालाच पाहिजे असेही नितेश राणेंनी म्हटलं आहे.