Premium

‘करिअर’च्या संधी नसलेल्या ‘वैद्यकीय पदव्युत्तर’च्या जागा रिक्त; शरीररचनाशास्त्र, जीवरसायनशास्त्र, न्यायवैद्यकशास्त्राकडे विद्यार्थ्यांची पाठ

२०२२ मध्ये सरकारी महाविद्यालयांमधील २३८ आणि खासगी महाविद्यालयांमधील ११८ जागा रिक्त आहेत.

doctor
(संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता)

विनायक डिगे, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा प्रवेश पात्रता निकष शून्य पर्सेटाईल केल्याने अधिकाधिक जागा भरण्यास मदत होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांमध्ये राज्यामध्ये रिक्त राहिलेल्या जागांमध्ये करिअरची फारशी संधी नसलेल्या अभ्यासक्रमांच्या जागा शिल्लक राहिल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने शरीररचनाशास्त्र, जीवरसायनशास्त्र, न्यायवैद्यकशास्त्र, सुक्ष्मजीवशास्त्र, शरीरविज्ञानशास्त्र आणि रोगप्रतिबंधक व सामाजिक वैद्यकशास्त्र या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये या अभ्यासक्रमांच्या ५५२ जागा रिक्त राहिल्या आहेत.

 राज्यामध्ये २०२१ मध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सरकारी व खासगी महाविद्यालयांच्या मिळून २०३१ जागांपैकी १९६ जागा रिक्त आहेत. तर, २०२२ मध्ये २२६९ जागांपैकी ३५६ जागा रिक्त आहेत. यामध्येही सरकारी महाविद्यालयांमधील जागा रिक्त राहण्याचे प्रमाण अधिक आहे.

हेही वाचा >>> पाच हजार गृहप्रकल्पांवर बडगा; महारेराच्या विकासकांना नोटिसा; नोंदणी रद्द होण्याची शक्यता

२०२१ मध्ये सरकारी महाविद्यालयांमधील १४७ तर, खासगी महाविद्यालयांमधील ४९ जागा रिक्त आहेत. २०२२ मध्ये सरकारी महाविद्यालयांमधील २३८ आणि खासगी महाविद्यालयांमधील ११८ जागा रिक्त आहेत. या जागा भरण्यासाठी वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश पात्रता निकष शून्यावर आणल्याने सर्व जागा भरल्या जातील आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणाची संधी उपलब्ध होईल, असे म्हटले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात २०२१ आणि २०२२ या दोन वर्षांमध्ये ज्या अभ्यासक्रमांचे शिक्षण घेतल्याने करिअरची फारशी संधी नाही किंवा प्राध्यापकच म्हणूनच काम करावे लागणार आहे. अशा पदव्युत्तर अभ्यासक्रमांकडे विद्यार्थी पाठ फिरवत आहेत. याउलट करियरच्या संधी असणाऱ्या अभ्यासक्रमांच्या जागाच शिल्लक राहत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

हेही वाचा >>> ‘आयफोन १५’च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; परराज्यांतील नागरिक मुंबईत दाखल

सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये ‘प्रक्टिस’ करण्याबरोबरच चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळविण्याच्या संधी असलेल्या छाती आणि क्षयरोग, नेत्रशास्त्र, वैद्यकशास्त्र, अस्थिव्यंगशास्त्र, शस्त्रक्रियाशास्त्र अशा अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या अभ्यासक्रमांच्या सरकारी तसेच खासगी महाविद्यालयांमध्ये जागा रिक्त राहत नाहीत. त्यामुळे प्रवेश पात्रता निकष शून्य पर्सेटाईल करण्याऐवजी ज्या अभ्यासक्रमांना मागणी नाही त्या जागा कमी करून मागणी असलेल्या अभ्यासक्रमांच्या जागा वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.

सर्वाधिक जागा रिक्त  अभ्यासक्रम

अभ्यासक्रम            २०२१   २०२२

शरीररचनाशास्त्र        २८     ४३

जीवरसायनशास्त्र २६     ४२

न्यायवैद्यकशास्त्र      २४     २८

सुक्ष्मजीवशास्त्र         ३८     ७०

रोगप्रतिबंधक व

सामाजिक वैद्यकशास्त्र  १६     ४३

औषधशास्त्र            २२     ३८

शरीरविज्ञानशास्त्र       २९     ३८

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Seat available in medical post graduate with no career opportunities zws

First published on: 23-09-2023 at 03:03 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा