मुंबई : शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही. त्यांनी तथाकथित शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले आहे, असे स्पष्ट करीत एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत, असे शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. शिंदे यांना मुख्यमंत्री केल्याने पुढील अडीच वर्षे तरी राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही, असा चिमटाही त्यांनी काढला.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर धक्कादायक राजकीय घटनाक्रमांत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची, तर देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हे शिवसेना-भाजपचे सरकार आहे, असा दावाही शिंदे-फडणवीस यांनी केला. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी शिवसेना भवनमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना, शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत आणि हे शिवसेनेचे सरकारही नाही, असे स्पष्ट केले.

 राज्यात नवे सरकार आल्यावर तथाकथित शिवसैनिकाला मुख्यमंत्री म्हणून भाजपला पाठिंबा द्यावा लागला ते पाहता २०१९ मध्ये अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घ्यावे या अमित शहा यांच्याबरोबर झालेल्या बैठकीतील प्रस्तावाची अंमलबजावणी झाली असती तर आज ही वेळ आली नसती. त्यावेळी ऐकले असते तर आज हेच सारे सन्मानाने झाले असते. लोकसभा-विधानसभेसाठी युती होत असताना हेच ठरले होते. आपली युती झालेली होती, मग त्यावेळी नकार देऊन मला मुख्यमंत्री व्हायला कशाला भाग पाडले, असेही ठाकरे यांनी सांगितले.

भाजपने आमचे ऐकले असते तर महाविकास आघाडी स्थापनही झाली नसती आणि अडीच वर्षे भाजपचा मुख्यमंत्री राहिला असता. आता तर पाचही वर्षे भाजपचा मुख्यमंत्री नाही, असे सध्याचे चित्र आहे. यात भाजपला काय आनंद मिळाला समजत नाही, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला. ज्याने माझ्या पाठीत वार केला त्या तथाकथित शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले आहे, अशी खंतही ठाकरे यांनी व्यक्त केली.

आरेत कारशेड नको

मेट्रो ३ चे कारशेड आरेमध्येच उभारण्याचा निर्णय नव्या सरकारने पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत घेतल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी टीका केली. माझ्यावर राग आहे तर तो माझ्यावरच काढा. मुंबईच्या काळजात कटय़ार खुपसू नका. मी कांजूरमार्गच्या जागेचा पर्याय सुचवला तो मेट्रो बदलापूपर्यंत नेणे सोपे होईल यासाठी. आरेच्या प्रकरणात मी पर्यावरणवाद्यांबरोबर आहे, त्यामुळे मुंबईच्या पर्यावरणाशी खेळ करू नका. मेट्रो कारशेडमुळे आरेमधील पर्यावरणाची हानी होणार आहे. हळूहळू त्या जंगलात बांधकामे वाढून वनजीवन धोक्यात येईल. तुम्हाला संपूर्ण जंगल उद्ध्वस्त करता येणार नाही, कारण आमच्या सरकारने ८०० एकर जंगल राखीव केले आहे. मेट्रो कारशेडसाठी कांजूरचा विचार करा. ती जमीन महाराष्ट्राच्या हितासाठी वापरा, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.

लोकशाहीवरील विश्वास उडेल

लोकशाहीचे चार स्तंभ मानले जातात. या स्तंभांनी लोकशाही वाचवण्यासाठी पुढे यावे. सध्या देशाच्या स्वातंत्र्यांचा अमृतमहोत्सव सुरू असून त्या वर्षांतच लोकशाहीचे धिंडवडे निघत आहेत. देशाच्या दृष्टीने हे घातक आहे. ज्या आमदारांना मत दिले ते सुरत-गुवाहाटी-गोवा असे कसे फिरत आहेत, असा प्रश्न मतदारांना पडला आहे. मतांचा असा बाजार मांडला गेला तर ते चुकीचे आहे. अशाने मतदारांचा लोकशाहीवरील विश्वास उडेल, असे सांगत लोकशाही वाचवण्यासाठी सर्वानी पुढे यावे असे आवाहन ठाकरे यांनी केले. त्याचबरोबर मुख्यमंत्रीपद सोडताना सामान्य माणसांच्या डोळय़ांत अश्रू दिसले. त्यांचा मी कायम ऋणी राहीन. त्यांच्याशी प्रतारणा करणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

ठाकरे म्हणाले..

  • भाजपने आमचे ऐकले असते तर महाविकास आघाडी स्थापनही झाली नसती, अडीच वर्षे भाजपचा मुख्यमंत्री राहिला असता..
  • ज्याने माझ्या पाठीत वार केला त्या तथाकथित शिवसैनिकाला मुख्यमंत्री करून भाजपला कसला आनंद मिळाला?
  • माझ्यावर राग आहे तर तो माझ्यावरच काढा,  मुंबईच्या काळजात कटय़ार खुपसू नका, आरेच्या प्रकरणात मी पर्यावरणवाद्यांबरोबर. मेट्रो कारशेड कांजूरलाचा करा.
  • मतांचा असा बाजार मांडला गेला तर ते चुकीचे आहे, अशाने मतदारांचा लोकशाहीवरील विश्वास उडेल.  लोकशाही वाचवण्यासाठी सर्वानी पुढे यावे.