दहीहंडीच्या ‘संकल्पा’त सेनेचा मोडता?

गेली १९ वर्षे वरळी येथील जांबोरी मैदानात साजऱ्या केल्या जाणाऱ्या दहीहंडी उत्सवाच्या ‘संकल्पा’त यंदा शिवसेनेने मोडता घातला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

वरळी येथील जांबोरी मैदानाच्या जागेवरून शिवसेना-राष्ट्रवादी आमने-सामने

गेली १९ वर्षे वरळी येथील जांबोरी मैदानात साजऱ्या केल्या जाणाऱ्या दहीहंडी उत्सवाच्या ‘संकल्पा’त यंदा शिवसेनेने मोडता घातला आहे. सार्वजनिक विभाग कार्यालयाने ३ सप्टेंबर रोजी उत्सव साजरा करण्यासाठी जांबोरी मैदान शिवसेनेला दिले आहे. त्यामुळे माजी गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांच्या संकल्प प्रतिष्ठानकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असून याबाबत न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय संकल्प प्रतिष्ठानने घेतला आहे.

जांबोरी मैदान प्रकरणावरून शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा नवा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे असून या वादामुळे गोविंदा पथकांमध्येही नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

माजी गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांच्या संकल्प प्रतिष्ठानतर्फे वरळी येथील जांबोरी मैदानावर १९९१ पासून दहीहंडी उत्सवाचे मोठय़ा प्रमाणावर आयोजन करण्यात येत आहे. दहीहंडी उत्सवातील अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, बडी राजकीय नेते मंडळी आणि नाटय़-सिने कलावंत यांच्या राबत्यामुळे अल्पावधीतच संकल्प प्रतिष्ठानचा उत्सव लोकप्रिय ठरला होता. ठाण्यातील लाखो रुपयांची पारितोषिक असलेली दहीहंडी फोडण्यासाठी ठाण्याला जाणारी मुंबईतील बहुतांश गोविंदा पथके जांबोरी मैदानावर आवर्जून हजेरी लावत होती. मुंबईमध्ये स्वाइन फ्लूचा मोठय़ा प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यामुळे २००९ मध्ये जांबोरी मैदानावरील दहीहंडी उत्सव रद्द करण्यात आला होता. मात्र हा अपवाद वगळता संकल्प प्रतिष्ठानचा दहीहंडी उत्सव अखंडपणे सुरू होता. दहीहंडीची उंची, थरातील लहान मुलांचा सहभाग यावरून प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्यानंतर गेल्या तीन वर्षांमध्ये संकल्प प्रतिष्ठान आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जांबोरी मैदानात पारंपरिक पद्धतीने दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येत होता.

यंदा शिवसेनेचे स्थानिक आमदार सुनील शिंदे यांनी जांबोरी मैदानामध्ये पारंपरिक पद्धतीने दहीहंडी उत्सव साजरा करण्याची तयारी दर्शवून हे मैदान मिळावे यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अर्ज केला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी जांबोरी मैदान शुल्क आकारून शिवसेनेला दिले. संकल्प प्रतिष्ठाननेही दहीहंडी उत्सवासाठी जांबोरी मैदान मिळावे याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अर्ज सादर केला होता. मात्र हा अर्ज फेटाळण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आली.

गेली अनेक वर्षे अखंडपणे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात येत असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाने यंदा मैदान देण्यास नकार दिल्याबद्दल संकल्प प्रतिष्ठानकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याविरोधात न्यायालयात दाद मागण्याची तयारी संकल्प प्रतिष्ठानकडून करण्यात येत आहे.

उत्सवासाठी जांबोरी मैदान मिळावे म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अर्ज केला होता. या विभागाने आम्हाला परवानगी दिली आहे. त्यामुळे प्रथा, परंपरेनुसार जांबोरी मैदानात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येईल. स्थानिक रहिवाशांना त्रास होणार नाही, मैदानाची नासधूस होणार नाही याची काळजी घेऊन उत्सव साजरा केला जाईल.

-सुनील शिंदे, शिवसेना आमदार

गेली अनेक वर्षे संकल्प प्रतिष्ठानतर्फे जांबोरी मैदानात पारंपरिक पद्धतीने दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येत होता. गेली दोन वर्षे संकल्प प्रतिष्ठानसोबत राष्ट्रवादी काँग्रेसही या उत्सवात सहभागी होत होती. शिवसेनेला जांबोरी मैदानात उत्सव साजरा करायचा होता तर त्यांनी त्याची कल्पना द्यायला हवी होती. मोठय़ा मनाने आम्ही उत्सवासाठी मैदान दिले असते. सार्वजनिक बांधकाम विभागाने परवानगी दिल्यामुळे शिवसेनेने उत्सवाचा दर्जा राखून आयोजन करावे.

-सचिन अहिर,अध्यक्ष, संस्कृती प्रतिष्ठान

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Shiv sena rashtravadi face to face from the jambori ground in worli

ताज्या बातम्या