पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी लोकसभेतील भाषणात सरकार आणि विरोधकांनी एकत्रित येऊन काम करण्याची गरज व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील अग्रलेखातून मोदीजी विरोधकांप्रमाणे मित्रपक्षांशीही संवाद साधा, असा खोचक सल्ला नरेंद्र मोदींना देण्यात आला आहे. ईर्षा नको संवाद हवा तरच देशाची प्रगती होईल, असा मंत्र मोदींनी आपल्या भाषणात दिला आहे. मात्र, अहंकार, ईर्षा व स्पर्धा या फेर्‍यांत कोण गुंतले आहे व त्यातून कसे मुक्त होता येईल? , याचा विचार झाला पाहिजे, असे सांगत केंद्रात आणि राज्यात भाजपकडून सेनेला मिळणाऱ्या उपेक्षित वागणुकीचा मुद्दादेखील अग्रलेखात उपस्थित करण्यात आला आहे.
विरोधकांशी संवाद हवा तसा जुन्याजाणत्या अनुभवी मित्रांशीही हवा. हा संवाद जास्त महत्त्वाचा आहे. पंतप्रधानांनी हाच विचार मांडलाय तो म्हणजे, एकमेकांशी ईर्षा न करता एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून आपण काम केले पाहिजे. विरोधी पक्षांशी मला संवाद हवा आहे, स्पर्धा नव्हे. मोदी यांनी शंभर टक्के सत्यच सांगितले, पण संवाद फक्त विरोधकांशीच असायला पाहिजे असे नाही, तो आपसात, मित्रपक्षांत, घरात, राज्यात व देशातही हवा, असे या अग्रलेखात म्हटले आहे.