नांदेडमधील सरकारी रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूवरून शिवसेनेच्या ठाकरे गटाने शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे. “रुग्णकांडातील बळी म्हणजे सरकारने केलेले अप्रत्यक्ष खूनच आहेत आणि त्यासाठी या खुनी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायलाच हवा. या सरकारमध्ये जराशीही माणुसकी व लोकभावनेची चाड उरली असेल तर राज्याच्या आरोग्यमंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा घेतला पाहिजे,” अशी मागणी ठाकरे गटाने केली. तसेच मिंध्यांकडे एवढी तरी नीतिमत्ता उरली आहे काय? असा सवाल केला. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात बुधवारी (४ ऑक्टोबर) ही टीका करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाकरे गटाने म्हटलं, “महाराष्ट्रात सरकार नावाची चीज शिल्लक राहिली आहे काय, असा प्रश्न उपस्थित व्हावा, अशी मृत्यूकांडे महाराष्ट्रात वारंवार घडत आहेत. औषधांच्या तुटवड्यामुळे राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या मृत्यूचे सत्रच सुरू आहे. महिनाभरापूर्वी ठाण्यात आणि आता नांदेड व छत्रपती संभाजीनगरात जे भयंकर रुग्णकांड झाले, ते अत्यंत वेदनादायक व संतापजनक आहे. देशातील सर्वात प्रगत राज्य, असे बिरुद अभिमानाने मिरवणाऱ्या महाराष्ट्राची मान आज शरमेने खाली झुकली आहे.”

“सत्तापिपासू मिंध्यांच्या गलथानपणामुळे किडे-मुंग्या मराव्यात त्या पद्धतीने मृत्यूचे तांडव”

“महाराष्ट्रात निपजलेल्या सत्तापिपासू मिंध्यांच्या गलथानपणामुळे किडे-मुंग्या मराव्यात त्या पद्धतीने सरकारी रुग्णालयांत मृत्यूचे तांडव सुरू आहे. महिनाभरापूर्वी ठाण्यातील कळवा येथे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत १८ रुग्णांचा अचानक मृत्यू झाला. त्या घटनेची चौकशी होत नाही, तोच मागील दोन दिवसांत मराठवाड्यात ५३ रुग्णांचा शासकीय रुग्णालयांमध्ये बळी गेला. होय, हे बळीच आहेत! याला नैसर्गिक मृत्यू म्हणताच येणार नाही,” असा शाब्दिक हल्लाबोल ठाकरे गटाने केला.

“२४ तास मलईच्या मागे धावणाऱ्या घटनाबाह्य सरकारला जाब द्यावाच लागेल”

ठाकरे गटाने पुढे म्हटलं, “नांदेडच्या शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाच्या शासकीय रुग्णालयात तर दोन दिवसांत ३५ रुग्णांचा तडफडून मृत्यू झाला. या ३५ पैकी १६ बळी तर नवजात अर्भकांचे आहेत. सोमवारी २४ जणांचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी नांदेड रुग्णालयात आणखी ११ जणांचा व छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयातही मंगळवारी १८ जणांचा बळी गेला. नांदेडमध्ये तर ज्या मुलांनी अजून हे जगही पाहिले नाही अशा १६ कोवळ्या कच्च्याबच्च्यांना काही कळण्याआधीच या जगाचा निरोप घ्यावा लागला. कोण आहे या मृत्यूंना जबाबदार? राज्यातील आरोग्य यंत्रणा रामभरोसे सोडून २४ तास मलईच्या मागे धावणाऱ्या राज्यातील घटनाबाह्य सरकारला याचा जाब द्यावाच लागेल. सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांचे मृत्यू वाढत आहेत हे ठाण्याच्या घटनेनंतर निदर्शनास येऊनही सरकार झोपा काढत राहिले.”

“आरोग्य सेवा व जीवरक्षक औषधांच्या साठ्यांकडे सरकारचे दुर्लक्ष”

“सरकारी रुग्णालयातील आरोग्य सेवा व जीवरक्षक औषधांच्या साठ्यांकडे सरकारने जे दुर्लक्ष केले, ते केवळ गंभीरच नव्हे तर गुन्हेगारी स्वरूपाचे आहे. ठाण्याच्या घटनेनंतर सरकारने एक चौकशी समिती नेमण्याची तेवढी औपचारिकता पार पाडली. आता नांदेडमध्येही भयंकर रुग्णकांडाची चौकशी करण्यासाठी अशीच एक समिती पाठविण्यात आली आहे. अशा चौकशा, समित्या आणि त्यांचे अहवाल ही फक्त रंगसफेदी आणि खऱ्या दोषींना वाचवण्यासाठी केलेली धूळफेक असते. यातून खरेच काही निष्पन्न झाले असते तर ठाण्याच्या घटनेनंतर राज्यातील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली असती. रुग्णालयातील मृत्युकांडामागील नेमके कारण सरकारने शोधले असते, पण तसे काहीही घडले नाही. महाराष्ट्रासारख्या विशाल राज्याच्या रुग्णालयांतील औषध खरेदीही तेवढीच ‘विशाल’. या विशाल औषध खरेदीतील काही व्यवहार किंवा त्यामागे दडलेले टक्केवारीचे ‘अर्थकारण’ तर या रुग्णकांडास जबाबदार नाही ना? यासाठी आता एखादी ‘ईडी’ चौकशी या सरकारमागील ‘महाशक्ती’ नेमणार आहे काय? औषधांचा तुटवडा का निर्माण झाला? तुटवडा नसेल तर अचानक एवढे मृत्यू एका रात्रीत कसे झाले?” असे प्रश्न ठाकरे गटाने विचारले.

“रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून औषधे विकत आणण्यासाठी पिटाळले जाते”

ठाकरे गट औषधांच्या तुटवड्यावरून सरकारवर हल्लाबोल करत म्हणाला, “औषधांचा तुटवडा नव्हता, असा दावा आरोग्य अधिकारी करीत असले तरी हे दावे पोकळ आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांनीच सरकारच्या या दाव्यांचा बुरखा फाडला आहे. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात एका रुग्णाच्या नातेवाईकास ५ औषधे लिहून दिली. यापैकी केवळ एकच औषध सरकारी रुग्णालयात उपलब्ध होते. बाकी ४ औषधे बाहेरून घेऊन या, असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. नांदेडच नव्हे, तर राज्यातील रुग्णालयांत सध्या औषध खरेदी ठप्प असल्यामुळे हेच घडते आहे. ही खरेदी नेमकी कुठल्या कारणांमुळे ठप्प आहे, याचे प्रामाणिक उत्तर राज्यातील ‘एक फुल दोन हाफ’ सरकार देऊ शकेल काय? खासगी रुग्णालयातील औषधोपचार परवडत नाहीत म्हणून तर गोरगरीब जनता सरकारी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येत असते. मात्र सरकारी रुग्णालयात दाखल झाल्यानंतरही रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून औषधे विकत आणण्यासाठी पिटाळले जाते तेव्हा सरकारी रुग्णालयांत जीव वाचविणारी महत्त्वाची औषधे उपलब्ध नाहीत याची खात्री पटते.”

हेही वाचा : नांदेड मृत्यूप्रकरणी राहुल गांधींनी व्यक्त केला संताप, म्हणाले, “भाजपाच्या नजरेत…”

“माणुसकीशून्य सरकारने एका अर्थाने रुग्णांचे पाडलेले हे खूनच”

“हे खरे असेल तर राज्यातील माणुसकीशून्य सरकारने एका अर्थाने रुग्णांचे पाडलेले हे खूनच आहेत, असे कुणी म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरविता येणार नाही. राज्यातील मिंधे सरकारला केवळ जमिनीच्या व्यवहारांत, मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यांतच रुची आहे. इतर पक्षांतील माणसे फोडण्यातच हे सरकार मश्गूल आहे. आरोग्य सेवेकडे लक्ष देण्यासाठी यांच्याकडे वेळ आहे कुठे? नांदेड व छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात या रुग्णांच्या नातेवाईकांनी व लहान-लहान बाळांच्या मातांनी जो हंबरडा फोडला आहे तो या मुर्दाड सरकारच्या कानांपर्यंत पोहोचणार आहे काय? मिंध्यांचे ट्रिपल इंजिन सरकार अधिकाऱ्यांमार्फत कितीही भंपक खुलासे करीत असले, तरी औषधांचा तुटवडा हेच ठाणे, नांदेड व छत्रपती संभाजीनगर येथील सरकारी रुग्णालयांतील मृत्यूकांडांचे खरे कारण आहे. महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालये व तेथील रुग्णसेवाच मृत्यूशय्येवर पडली आहे. आरोग्य यंत्रणेची बेपर्वाई आणि सरकारी अनास्थेचे बळी यांसारखे शब्दप्रयोग या रुग्णकांडांसाठी पुरेसे नाहीत. रुग्णकांडातील बळी म्हणजे सरकारने केलेले अप्रत्यक्ष खूनच आहेत व त्यासाठी या खुनी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायलाच हवा! या सरकारमध्ये जराशीही माणुसकी व लोकभावनेची चाड उरली असेल तर राज्याच्या आरोग्यमंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा घेतला पाहिजे. मिध्यांकडे एवढी तरी नीतिमत्ता उरली आहे काय?” असा प्रश्न ठाकरे गटाने विचारला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena thackeray faction criticize shinde fadnavis pawar government over patient death pbs
First published on: 04-10-2023 at 09:36 IST