एका जवाहिऱ्याच्या व्यवस्थापकावर गोळीबार करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या रवी पुजारी टोळीतील सहा गुंडांना महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये विशेष न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. खार जिमखान्याचा सदस्य असलेल्या रवी पंजाबी याचाही यात समावेश असून, रवी पुजारीला खंडणीसाठी खबर देण्याचे काम तो करीत होता. या निकालामुळे व्यावसायिक, बिल्डर तसेच सिनेक्षेत्रातील मंडळींना खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या पुजारी टोळीविरुद्ध जोरदार आघाडी उघडणाऱ्या मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाला दिलासा मिळाला आहे.
ओशिवरा येथील एका ज्वेलर्सच्या शोरूमवर या टोळीतील तिघा गुंडांनी गोळीबार करीत दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. या गोळीबारात व्यवस्थापक गंभीर जखमी झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करून खंडणीविरोधी कक्षाने तपास सुरू केला. तत्कालीन सहआयुक्त हिमांशू रॉय तसेच निवृत्त सहायक आयुक्त अशोक दुराफे यांच्या नेतृत्वाखाली खंडणीविरोधी कक्षाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक शशिकांत जगदाळे यांनी तपास करून हर्षन मारू, कन्नू ठाकूर, परेश नेपाळी ऊर्फ पीडी, नरेंद्र सोनी ऊर्फ लाला, हरकबहादूर भंडारी ऊर्फ राजू यांच्यासह पंजाबीला जुलै २०१० मध्ये अटक केली. त्यांच्याकडून दोन पिस्तुले, सहा जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली होती. या प्रकरणात रवी पुजारीला फरारी दाखविण्यात आले होते, तसेच या गुंडांविरुद्ध मोक्काअन्वये कारवाई करण्यात आली.
विशेष न्यायालयाचे न्या.पी. आर. देशमुख यांच्यापुढे २०१३ पासून हा खटला सुरू होता. या काळात तब्बल ४४ साक्षीदार तपासण्यात आले. त्यानंतर न्या. देशमुख यांनी पंजाबी याच्यासह सहा जणांना दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. खंडणीविरोधी कक्षाचे विद्यमान वरिष्ठ निरीक्षक विनायक वत्स व निरीक्षक संजीव धुमाळ यांनीही तपासात महत्त्वाची भूमिका बजावली. पोलिसांतर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी काम पाहिले.