अधिकाधिक थंड होत चाललेल्या वाऱ्यांची चर्चा मुंबईकरांमध्ये रंगत असली तरी ‘व्हॉट्स अ‍ॅप’वर शहरातील रस्त्यांवर बर्फ पडत असल्याची छायाचित्रे फिरल्याने दोन दिवस गोंधळ उडाला. शेकडो अतिउत्साही नागरिकांनी वेधशाळेत विचारणा करण्यास सुरुवात केल्याने त्यांना दूरध्वनीवरून उत्तरे देता देता वेधशाळेतील अधिकाऱ्यांच्याही नाकी नऊ आले. मुंबईत आजतागयत बर्फवृष्टी झालेली नाही व मुंबईचे सध्याचे हवामान पाहता हिमवर्षांव होऊ शकत नाही, असे वेधशाळेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
गेल्या आठवडय़ापासून मुंबईचे किमान तापमान १३ ते १५ अंश सेल्सिअस दरम्यान रेंगाळत आहे. उत्तरेच्या बर्फाळ थंडीच्या तुलनेत हे वातावरण उबदार असले तरी नेहमीच्या घामापासून सुटका देणाऱ्या दोन महिन्याच्या गुलाबी थंडीचे मुंबईकरांना अप्रुप असते आणि त्यामुळेच सकाळच्या थंडीची, दुपारच्या बोचऱ्या वाऱ्याची चर्चा संध्याकाळपर्यंत रंगते. यातच शनिवारी मुंबईत बर्फ पडला असल्याचा संदेश ‘व्हॉट्स अ‍ॅप’वरून फिरू लागला. तथाकथित बर्फ पडलेल्या रस्त्यांचे फोटोही त्यासोबत फिरत होते. हे फोटो पाहून काही हौशी माणसांनी सरळ वेधशाळेतील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायला सुरुवात केली.
‘वेधशाळेकडे मुंबईतील हवामानासंबंधी शंभरहून अधिक वर्षांची माहिती उपलब्ध आहे. त्यानुसार आजतागायत मुंबईत कधीही बर्फ पडलेला नाही. बर्फवृष्टीसाठी तापमान दोन अंशांहून
कमी हवे. मुंबईत सध्या किमान तापमानही १५ अंशांदरम्यान आहे.
सध्याचे हवामान पाहता असे काही होण्याची शक्यता नाही,’ असे वेधशाळेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मुंबईतील गेल्या शंभर वर्षांतील सर्वात कमी तापमान २२ जानेवारी १९६२ रोजी ७.४ अंश सेल्सिअस होते. त्यापेक्षा कमी तापमान शहरात झाले नसल्याने बर्फवृष्टी होण्याचा संभव नाही. त्यामुळे अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन वेधशाळेतील अधिकाऱ्यांनी केले.
हिमवृष्टी केव्हा होते
ढगातून पावसाचा थेंब पडतो तेव्हा तो बर्फ स्फटिकांच्या स्वरूपात असतो. मात्र खाली येताना हवेतील उष्णतेमुळे त्याचे पाण्याच्या थेंबात रुपांतर होते. जेव्हा जमिनीजवळच्या हवेचे तापमानही दोन अंश सेल्सिअसपेक्षा कमी असते तेव्हा बर्फ स्फटिक विरघळत नाही. तापमान यापेक्षा किंचित अधिक असेल तेव्हा स्फटिकाच्या आवरणाचा भार वितळण्यास सुरुवात होते. पण त्यामुळे आजुबाजूची हवा थंड होते व विरघळण्याची प्रक्रिया थांबते व हिमवृष्टी सुरू राहते. हिमवृष्टीसाठी वातावरणात बाष्प असणे महत्त्वाचे आहे. कोरडय़ा हवेचे तापमान कितीही थंड असले तरी तेथे बर्फवृष्टी होण्याची शक्यता नाही.