मुंबईबाहेरून शहरात झटपट पोहोचण्यासाठी उभारण्यात आलेल्या पूर्व मुक्त महामार्गाला सोमवारी संथगती लाभली होती. नवे गतिरोधक बसवण्यात आल्याने एरवी भरधाव वेगाने धावणाऱ्या या मार्गावर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी नऊ वाजल्यापासून या मार्गावर कोंडी निर्माण झाल्याने दक्षिण मुंबईकडे येणाऱ्या वाहनांना याचा फटका बसल्याचे पाहायला मिळाले.
छत्रपती शिवाजी टर्मिनस ते चेंबूर यांना जोडणारा सुमारे १३ किलोमीटरचा हा मुक्त मार्ग पार करण्यासाठी साधारण १५ ते २० मिनिटांचा कालावधी पार होतो. मात्र सुरक्षेच्या मुद्दय़ावरून या मार्गावर गतिरोधक बसवण्यात आल्याने या मार्गाची वाहतूक मंदावली होती. रोज भरधाव वेगात धावणाऱ्या गाडय़ांना हा मार्ग पार करण्यासाठी सुमारे ४० ते ४५ मिनिटांचा कालावधी लागत होता. दक्षिण मुंबईकडे येताना वाहतूक कोंडीचा सामाना करावा लागू नये, यासाठी वाहनचालकांकडून पूर्व मुक्त मार्गाचा पर्याय निवडला जातो. मात्र नव्या गतिरोधकांच्या कामामुळे सकाळपासूनच या मार्गावर कोंडी निर्माण झाली होती. दरम्यान, अपघात टाळण्यासाठी गतिरोधक बसवण्यात आल्याने वाहतूक कोंडी झाल्याचे वाहतूक नियंत्रक कक्षातून सांगण्यात आले.