अंतरिम वेतनवाढीचा अहवाल सादर नाही; महामंडळाकडून माहिती देण्यासही नकार

सातवा वेतन आयोगासह अन्य काही मागण्यांसाठी एसटी महामंडळाच्या महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेकडून दिवाळीत बेमुदत संप पुकारला होता. या संपाला इंटकसह (महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स काँग्रेस) अन्य पाच संघटनांनीही पाठिंबा दिला. त्यानंतर न्यायालयाने हस्तक्षेप करत वेतनवाढीसंदर्भात समितीही स्थापन केली होती. १५ नोव्हेंबपर्यंत अंतरिम मुदतवाढीचा आणि २२ डिसेंबपर्यंत वेतनवाढीचा अहवाल देण्यास एसटी महामंडळाला न्यायालयाने सांगितले. परंतु अद्यापही अहवाल सादर केला नसल्याचे सांगून मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटना आणि इंटक संघटनेने जानेवारी २०१८ मध्ये पुन्हा बेमुदत संपाचा इशारा दिला आहे.

महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेची गुरुवारी नगरमध्ये आणि इंटक संघटनेची औरंगाबादमध्ये राज्यस्तरीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत संपाचा इशारा देण्यात आला. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी १० जानेवारीपर्यंत निर्णय न झाल्यास त्यानंतर पुन्हा बेमुदत संप पुकारला जाईल, असा इशारा दिला. १५ नोव्हेंबपर्यंत अंतरिम अहवाल आणि २२ डिसेंबपर्यंत वेतनवाढीवर निर्णय होणे अपेक्षित आहे. मात्र यावर आता १० जानेवारी रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे. १५ नोव्हेंबपर्यंत वेनतवाढीचा अंतरिम अहवालही सादर झालेला नाही. त्यामुळे जानेवारी महिन्यात निर्णय झाला नाही तर संप अटळ आहे. इंटक संघटनेचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनीही अहवाल सादर झाला नसल्याचे सांगून स्थापन झालेल्या समिती आणि एसटीकडून न्यायालयाचा अवमान करण्यात आल्याचा आरोप केला. त्यामुळे आमच्याकडून अवमान नोटीसही समिती आणि महामंडळाला पाठवण्यात येणार आहे. एसटी महामंडळाकडून यासंदर्भात कोणतीही माहिती देण्यात येत नसून त्यामुळे कामगारांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे तिगोटे म्हणाले. एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांनी १५ नोव्हेंबपर्यंत सादर करण्यात येणारा अहवाल सादर झाला की नाही याबाबत माहिती देण्यास नकार दिला.

संघटना संतप्त

१५ नोव्हेंबपर्यंत अंतरिम अहवाल आणि २२ डिसेंबपर्यंत वेतनवाढीवर निर्णय होणे अपेक्षित आहे. मात्र यावर आता १० जानेवारी रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे. १५ नोव्हेंबपर्यंत वेनतवाढीचा अंतरिम अहवालही सादर झालेला नाही. त्यामुळे जानेवारी महिन्यात निर्णय झाला नाही तर संप अटळ आहे असा इशारा देण्यात आला आहे.