मुंबई : देशाची विकासमार्गावर वेगाने घोडदौड सुरू असून २०४७ मध्ये विकसित देशांमध्ये त्याची गणना होईल आणि देशाची अर्थव्यवस्था जगातील तिसऱ्या क्रमांकाची होईल. राष्ट्रउभारणीसाठी तरुणांचे योगदान महत्वाचे असून नवनवीन संकल्पना घेऊन त्यांनी नवभारताचे शिल्पकार व्हावे. तेजांकित तरुणच देशाचे भविष्य आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी शुक्रवारी ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कार सोहळय़ात केले.

कला, क्रीडा, मनोरंजन, साहित्य, प्रशासन, विज्ञान-तंत्रज्ञान, कायदा, नवउद्यमी, उद्योग अशा विविध क्षेत्रांत आपल्या कार्याने मापदंड निर्माण करणाऱ्या १८ प्रज्ञावंतांना पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘लोकसत्ता तरुण तेजांकित पुरस्कार’ प्रदान करून गौरवण्यात आले. लोअर परळ येथील सेंट रेजीस हॉटेलमध्ये शुक्रवारी सायंकाळी रंगलेल्या या सोहळय़ातील पुरस्कार विजेत्यांची कल्पकता, प्रज्ञा आणि नवसंकल्पनांचे गोयल यांनी विशेष कौतुक केले. मध्यमवर्गीय पाश्र्वभूमी असलेल्या या तरुण-तरुणींची कामगिरी अतिशय उत्कृष्ट असून त्यातून मलाही नवी उर्जा व उर्मी मिळाली आहे. अशा कर्तबगार तरुणांच्या हाती देश सुरक्षित आहे, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. अशा प्रकारे तरुणांना सन्मानित करणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या उपक्रमाचीही त्यांनी प्रशंसा केली.

हेही वाचा >>>शुल्कमाफीनंतर अंबानी रुग्णालयाला भूखंड ? अंधेरीतील अडीच एकरच्या भूखंडावरील आरक्षण हटवण्याच्या हालचाली

‘देशाची अर्थव्यवस्था १० वर्षांपूर्वी अतिशय नाजूक अवस्थेत होती. पण गेल्या दहा वर्षांत आर्थिक धोरणे बदलली, गुंतवणूक वाढली, उद्योगांना चालना मिळाली आणि देशाची अर्थव्यवस्था आज जगात पाचव्या क्रमांकावर गेली आहे. देशाच्या स्वातंत्र्याला २०४७ मध्ये १०० वर्षे होतील, तेव्हा भारताची गणना जगात विकसित राष्ट्र म्हणून होईल आणि पुढील पाच-सात वर्षांत अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर जाईल,’ असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास वेगाने होत आहे. देशात आतापर्यंत कधीच झाली नाही, एवढी प्रचंड गुंतवणूक पायाभूत सुविधा क्षेत्रात होत आहे. देशात भ्रष्टाचारमुक्त सुशासन असून गरीब कल्याणाचा कार्यक्रम सुनियोजित पद्धतीने राबविला जात असल्याने देश विकसित होईल, तेव्हा गरिबी राहणार नाही. गुलामगिरीची भावनाही शिल्लक राहणार नाही, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी ‘इंडियन एक्स्प्रेस’ समूहाचे कार्यकारी संचालक अनंत गोएंका, कौशल्यविकास आणि मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. २०२३ या वर्षांसाठीच्या ‘तरुण तेजांकित’ विजेत्यांची निवड करणाऱ्या पुरस्कार निवड समितीचे सदस्य आयआयटी-मुंबईचे प्राध्यापक डॉ. मिलिंद अत्रे, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालक डॉ. मुक्ता पुणतांबेकर, प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, ‘पीडब्ल्यूसी’चे अल्पेश कांकरिया यांचा अनंत गोएंका यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

हेही वाचा >>>सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान

‘असा कार्यक्रम पाहिला नाही’

‘तरुण तेजांकित’ उपक्रमाने आपल्याला प्रभावित केल्याचे सांगताना गोयल म्हणाले,‘आतापर्यंत मी अनेक पुरस्कार वितरण कार्यक्रमांना गेलो, पण असा कार्यक्रम कधी पाहिला नाही.’ हे पुरस्कारविजेते कोणतेही आडनाव किंवा घराण्यामुळे पुढे आलेले नसून आपल्या कर्तबगारीने ते विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करत आहेत. हे तरुणच देशाचे भविष्य असून त्यांच्या हाती देश सुरक्षित आहे, असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला.

‘तेजांकितांचा पुढचा प्रवास अभिमानास्पद’

विविध क्षेत्रात प्रतिभावंत तरुणांचे मोठय़ा प्रमाणावर काम सुरू आहे त्यांचे हे काम लोकांपुढे आणावे या हेतूने हा उपक्रम सहा वर्षांपूर्वी सुरू केला होता. दरवर्षी या पुरस्कारासाठी साडेचारशे ते पाचशे अर्ज येतात. त्यातून छाननी आणि मूल्यमापन करून ४० ते ५० जणांचे नामांकन होते. त्यातून निवड समिती १७ ते १८ जणांची निवड करत असते. ‘लोकसत्ता’चा या निवड प्रक्रियेत सहभाग हा नाममात्र असतो. गेल्या सहा वर्षांत आतापर्यंत निवडलेल्या तरुण तेजांकिताचा त्यांच्या क्षेत्रातील पुढचा प्रवास बघताना खूप अभिमान वाटतो, आशा भावना ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी प्रास्ताविकात व्यक्त केल्या.

‘भाजपमध्ये घराणेशाहीला थारा नाही

कोणताही नेता आपला मुलगा किंवा मुलगी यांना पुढे आणू शकत नाही. त्यांचा राजकीय वारसा चालवला जाऊ नये, असे नाही. पण मुलांनी स्वत:ची कर्तबगारी सिद्ध करावी लागते. मी १९८४ पासून पक्षात कार्यरत होतो. आई चंद्रकांता गोयल अपघाताने राजकारणात आली व तीन वेळा विधानसभा निवडणुकीत विजयी झाली. तिने २००४ मध्ये राजकारणातून निवृत्ती घेतली. वडीलही २००८ मध्ये गेले. आईवडील राजकारणात असेपर्यंत मला भाजपमध्ये कोणतेही पद नव्हते. मला २०१० मध्ये दिल्लीतील राजकारणात संधी देण्यात आली व राजकारणात पाठविले गेले. आता भाजपने लोकसभेसाठी उत्तर मुंबई मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे,’ असे गोयल यांनी सांगितले.

लोकसत्ता तरुण तेजांकित – २०२३

अतुल कुलकर्णी : कायदा व धोरण
राहुल कर्डिले : कायदा व धोरण
नेहा पंचमिया : सामाजिक
विवेक तमाईचिकर : सामाजिक
राजू केंद्रे : सामाजिक
सूरज एंगडे : सामाजिक साहित्य
सायली मराठे : उद्योजिका
अनंत इखार : उद्योजक
निषाद बागवडे : नवउद्यमी
रुतिका वाळंबे : नवउद्यमी
अभिषेक ठावरे : क्रीडा
ओजस देवतळे : क्रीडा
दव्या देशमुख : क्रीडा
ज्ञानेश्वर जाधवर : कला
प्रियांका बर्वे : मनोरंजन
वरुण नार्वेकर : मनोरंजन
हेमंत ढोमे : मनोरंजन
प्रिया बापट : मनोरंजन