माथेरानची गाडी पुन्हा एकदा सुरू करण्याची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली. पण ११० र्वष जुन्या या गाडीला खऱ्या अर्थाने संजीवनी देण्याची गरज आहे. परदेशात आजही शंभराहून अधिक र्वष जुन्या टॉय ट्रेन्स उत्तम प्रतिसादात चालतात, मात्र त्यासाठी जुने तंत्रज्ञान सोडून नवे तंत्रज्ञान स्वीकारायची आणि त्यासाठी खर्च करण्याची गरज आहे.

दोन आठवडय़ांपूर्वी सगळ्याच वर्तमानपत्रांमध्ये छापून आलेल्या एका बातमीने सगळ्यांचे लक्ष आकर्षून घेतले. त्या बातमीनंतर अनेक उलटसुलट चर्चाही झाल्या, अग्रलेखही छापून आले. बातमी होती नेरळहून डोंगराच्या पोटातून वळणंवळणं घेत माथेरानला घेऊन जाणारी टॉय ट्रेन बंद पडल्याची! मग ही गाडी बंद पडल्यामुळे काय काय विपरीत परिणाम झाले, हेदेखील छापून आले. मग रीतसर शिष्टमंडळाने रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतली. रेल्वेमंत्र्यांनीही एक लोकप्रिय गाडी बंद पडण्याचे पातक आपल्या भाळी लागू नये, यासाठी ही गाडी पुन्हा सुरू करण्याचे आदेश मध्य रेल्वे प्रशासनाला दिले. मध्य रेल्वे प्रशासनाने सरकारी कामकाजानुसार ही गाडी सुरू करण्यात येईल, मात्र त्याला काही काळ लागेल, असे जाहीर केले. आता पावसाळ्याआधी या गाडीची कामे झाली, तर ही गाडी पावसाळ्याआधी काही दिवस धावेल. नाही तर ही गाडी सुरू होण्यासाठी पावसाळा सरण्याची वाट पाहावी लागणार आहे.
नेरळ-माथेरान हे २१ किलोमीटरचे अंतर अगदी दोन-अडीच तास एवढय़ा फुरसतीत पार करणारी माथेरानची ही टॉय ट्रेन एखाद्या बडय़ा ख्यालसारखी आहे. एखाद्या रागाची ओळख करून देण्यासाठी त्या रागात गुंफलेले चार मिनिटांचे गाणेही पुरेसे असते. पण त्या रागाला बिलगण्यासाठी, त्याची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी कुशल गायकाने गायलेला बडा ख्याल आवश्यक असतो. माथेरानपर्यंतची निसर्गशोभा पटापट दाखवत टॅक्सी अध्र्या तासात घेऊन जाते. पण त्या निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी, गळाभेट करून देण्यासाठी ही टॉय ट्रेन कधीही उत्तमच! हा २१ किमीचा मार्ग बांधण्याची सुरुवात झाली ती १९०१ मध्ये आणि हे काम १९०७ मध्ये संपले. सर आदमजी पीरभॉय यांनी त्या वेळी १६ लाख रुपये खर्च करून हा मार्ग बांधला. तेव्हापासून आजतागायत माथेरानला जाण्यासाठी आरामदायक आणि बच्चेकंपनीसाठीच नाही, तर मोठय़ांसाठीही हवाहवासा पर्याय म्हणून या गाडीकडे पाहिले जाते.
या ११० वर्षांच्या कालावधीत ही गाडी २००५ मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे तब्बल दोन वष्रे बंद पडली होती. अखेर स्थानिक रेटा, महाराष्ट्र सरकारचे प्रयत्न आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या मदतीने २००७ मध्ये हा मार्ग पुन्हा सुरू झाला. त्यासाठी प्राधिकरणाने १० कोटी रुपये आणि महामंडळाने ५० लाख रुपये एवढी मदतही केली. माथेरामधील पर्यटन व्यवसायाला पुन्हा एकदा उभारी आली. पण त्यानंतर गेल्या पंधरवडय़ात दोन वेळा या गाडीचे डबे रूळांवरून घसरल्याने मध्य रेल्वेने प्रवासी सुरक्षेचे कारण देत ही गाडी बंद करण्याचा निर्णय घेतला.
वास्तविक आजमितीला जगभरातील अनेक देशांमध्ये माऊंटन ट्रेन्स किंवा अशा टॉय ट्रेन चालतात. नुसत्याच चालत नाहीत, तर प्रचंड फायद्यात चालतात. यात अमेरिका, कॅनडा, स्वित्र्झलड, जर्मनी अशा अनेक देशांचा समावेश आहे. एकटय़ा स्वित्र्झलडमध्ये २५हून अधिक रेल्वेमार्ग हे डोंगरदऱ्यांतून जाणारे आहेत आणि त्या ठिकाणी माथेरानसारखीच पण अत्याधुनिक रेल्वे चालवली जाते. तर अमेरिकेत वेस्ट व्हर्जििनया येथील कास सिनिक रेल्वे, आर्कान्सास अ‍ॅण्ड मिसुरी रेल्वे, न्यू हॅम्पशायरमधील माऊंट वॉिशग्टन कॉग रेल्वे, ओरेगॉनमधील माऊंट हूड रेलरोड अशा अनेक कंपन्या ही सेवा देतात. या माऊंटन रेल्वेचा वापर मुख्यत्वे पर्यटनासाठी होतो. आणि त्या रेल्वेमधून जाण्यासाठी पर्यटक भलीथोरली रक्कमही मोजतात.
भारतातील माऊंटन ट्रेनकडे नजर टाकल्यास अशा रेल्वे मुख्यत्वे दार्जििलग, माथेरान, उटी या थंड हवेच्या ठिकाणी धावतात. पण या गाडय़ा पर्यटकांप्रमाणेच किंवा त्याहूनही जास्त तेथील स्थानिकांसाठी चालवल्या जातात. परदेशात रेल्वेप्रवास हा अत्यंत आलिशान आणि महागडा मानला जातो. तर आपल्या देशात रेल्वे प्रवासासारखा स्वस्त प्रवास नाही. नेमक्या याच गोष्टीमुळे या टॉय ट्रेन्सवरही तेथील स्थानिक लोक आजही मोठय़ा प्रमाणावर अवलंबून आहेत. त्यामुळे माथेरानसारखी गाडी बंद पडते तेव्हा त्याचा परिणाम पर्यटनापेक्षाही तेथील स्थानिकांचे रोजगार, आसपासच्या परिसरातील तब्बल आठ हजारांहून अधिक आदिवासी लोकांचे दळणवळण यावर होतो.
परदेशातील रेल्वे आणि आपल्या येथील माऊंटन रेल्वे यातील आणखी एक मोठा फरक म्हणजे तंत्रज्ञानातील सुधारणा. परदेशातील रेल्वेगाडय़ांनी त्यात मोठी मजल मारली आहे. तेथील रेल्वे वाहतुकीत खासगी कंपन्या मोठय़ा प्रमाणात आहेत. या कंपन्या पसे टाकायला तयार असतात. त्याचप्रमाणे सरकारही त्यांचा वाटा उचलते. आपल्या देशात ही रेल्वे म्हणजे पूर्णपणे सरकारची जबाबदारी आहे. ती जबाबदारी सरकार पूर्ण करत नसल्याचे खेदाने म्हणावेसे वाटते आणि आकडेवारीही त्याला पािठबा देते. माथेरान, दार्जििलग किंवा उटी येथील या छोटय़ा गाडय़ांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यासाठी त्यात मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक आवश्यक आहे. त्याशिवाय त्यातून महसूल मिळवणे रेल्वेला शक्य होणार नाही. माथेरानच्या गाडीसाठी मध्य रेल्वे वर्षांला फक्त २० कोटी रुपये एवढाच खर्च करते. त्यापकी ७० टक्के खर्च हा कर्मचाऱ्यांचे पगार आणि त्यासाठी उभारलेल्या इमारतींवर होतो. उर्वरित ३० टक्क्यांमध्ये तंत्रज्ञानात सुधारणा कशी होणार, हा मुद्दा आहे. सध्या या गाडीतून दर दिवशी १५००हून अधिक प्रवासी प्रवास करतात आणि रेल्वेला साधारण दिवसाला एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. ते वाढवण्यासाठी रेल्वेला स्वत:चा थोडा पसा टाकावा लागणार आहे.
माथेरानला जाणाऱ्या पर्यटकांना आरामदायक आसनव्यवस्था असलेली, खानपान सेवा देणारी, सभोवारच्या निसर्गाचे उत्तमरीत्या दर्शन घडवणारे काचेचे छत असणारे डबे अशी गाडी सुरू केली, तर पर्यटक पसे मोजायलाही तयार होतील. पण रेल्वेसमोरचा
प्रश्न सध्या प्रवासी सुविधा हा नसून प्रवासी सुरक्षा हा आहे.
त्यासाठी दरवर्षी २० कोटी एवढी तुटपुंजी रक्कम टाकून काम होणार नाही. काही वष्रे सातत्याने एक मोठी रक्कम टाकून त्यासाठी इंजिन बदलण्यापासून रूळांची देखभाल, सिग्नल
यंत्रणेत बदल, ब्रेक यंत्रणेत बदल आदी गोष्टी गरजेच्या आहेत. या गोष्टी न करता केवळ मलमपट्टी करून काही काळासाठी ही गाडी चालू करणे, हा खरा प्रवाशांच्या जिवाशी खेळ आहे. तो थांबवला नाही, तर दमलेल्या राणीच्या कहाणीचा शेवट दुर्दैवी होईल.
रोहन टिल्लू

Devendra Fadnavis
“काँग्रेसच्या काळात पोलिओची लस तयार झाली म्हणून…”, करोना लसीबाबत केलेल्या विधानावरून जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला!
Piyush Goyal determination to make North Mumbai great Mumbai Maharashtra Day 2024
उत्तर मुंबईला ‘उत्तम मुंबई’ करू; गोयल यांचा निर्धार ; राहुल गांधींनी लढण्याचे आव्हान
case filed in Actor Aamir Khan deep fake tape case
अभिनेता आमिर खान डीपफेक चित्रफीतीप्रकरणी गुन्हा दाखल
murder of girlfriend, mumbai,
मुंबई : प्रेयसीच्या हत्येप्रकरणी ३० वर्षीय व्यक्तीला अटक