मुंबई : केईएम रुग्णालयाच्या सेवा निवासस्थानात राहणाऱ्या व सेवानिवृत्त झालेल्या सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांचे देय दावे उपप्रमुख लेखापालांकडून मागील वर्षभरापासून देण्यास टाळटाळ केली जात आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणीबरोबरच मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या हेकेखोर आणि मनमानी कारभाराविरोधात म्युनिसिपल मजदुर युनियनतर्फे सोमवारी सकाळी ११ वाजल्यापासून रुग्णालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

कर्मचाऱ्यांना निवासस्थान देताना त्यांना भाडेमुक्त निवास या आदेशाअंतर्गत दिला जातो. तसेच त्यांच्या वेतनातून घरभाडे भत्ता कापून घेण्यात येत असताना आता लेखा विभागातील अधिकाऱ्यांनी मनमानी पद्धतीने व नियमबाह्यरित्या कोणाचीही परवानगी न घेता पूर्वलक्षी प्रभावाने १० टक्के भाडे वसूल करणारच असा निर्णय घेतला आहे. तसेच जोपर्यंत १० टक्के भाडे वेतनातून कापत नाही, तोपर्यंत सेवानिवृत्ती पश्चात देण्यात येणारे दावे निकाली काढणार नाही अशी भूमिका घेत अनेक वर्षे रुग्णसेवा केलेल्या सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या देय हक्कापासून वंचित ठेवत आहे.

हेही वाचा – सरकारच्या कामांचा लेखाजोखा मांडत शिंदे गटाचा प्रचार

हेही वाचा – चार हजार कोटींच्या निवडणूक रोख्यांचा हिशेब नाही! प्रशांत भूषण यांचा दावा; एसआयटी चौकशीसाठी लवकरच याचिका

जाणीवपूर्वक दावे प्रलंबित ठेवल्यामुळे सर्व संवर्गातील कामगार, कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांनीही कर्मचाऱ्यांच्या वेतनातून १० टक्के भाडे कापण्यात येऊ नये अशा सूचना दिल्या असतानाही वर्षभरापासून वारंवार विनंती करूनही लेखापाल देय दावे निकाली काढण्यास तयार नाहीत. त्यामुळे सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सकाळी ११ वाजल्यापासून रुग्णालय परिसरात ठिय्या आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाची दाखल घेत रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी म्युनिसिपल मजदुर युनियनचे पदाधिकारी आणि सेवानिवृत्त कर्मचारी यांच्याशी चर्चा सुरू केली आहे.