वयाच्या अवघ्या विशीत राजकारणात प्रवेश केल्यानंतर व्यवस्थापन, इंधन, ऊर्जा, कायदा, अशा विषयांत अभ्यासपूर्ण रस घेता घेता उत्तम वक्तृत्वाच्या बळावर सभा आणि सभागृह जिंकत जिंकत नागपूरच्या महापौरपदापासून उत्तम संसदपटुत्वाचाही मान मिळविणारे, संघ संस्काराचा वारसा घेऊन भाजयुमोच्या अध्यक्षपदापासून भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदापर्यंतच्या जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचलेले तरुण, अभ्यासू लोकाभिमुख नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकीर्दीची त्रिवर्षपूर्ती आणि ‘लोकसत्ता’चा ७०वा वर्धापन दिन असा योग जुळून आला आणि वर्धापन दिनाच्या आनंदसोहळ्यात प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी मुख्यमंत्र्यांना बोलते केले. त्याचा हा संपादित अंश..

* वयाच्या विशीत नगरसेवकपद मिळविणाऱ्या आपल्याला या राज्याचे सर्वोच्च पद मिळेल असे कधी वाटले तरी होते का?

– खरं सांगायचं तर मी नगरसेवक म्हणून ज्या वेळी निवडून आलो त्या वेळी नगरसेवक झालो याचेच इतके अप्रूप होते की यापुढे जाऊ असे कधी वाटलेच नव्हते. नगरसेवक झालो त्या वेळी महापौर होऊ असं वाटलं नव्हतं, महापौर झालो तेव्हा आमदार होऊ असं वाटलं नव्हतं आणि आमदार झालो तेव्हाही मुख्यमंत्री होऊ असंही कधी वाटलं नव्हतं. पक्षाच्या माध्यमातून विभागात काम करीत असताना मला सांगण्यात आलं, की आता निवडणुका येताहेत, तुला लढायचं आहे. मी त्यांना हेही सांगू शकलो नाही की अजून माझं निवडणूक लढण्याचं वय झालेलं नाही. कारण त्या वेळी मी वयाची २१ वर्षे पूर्ण केली नव्हती. याच दरम्यान ७४व्या घटनादुरुस्तीचे वारे सुरू झाल्याने महापालिकेची निवडणूक सहा महिन्यांनी पुढे गेली. दरम्यानच्या काळात माझी २१ वर्षे पूर्ण झाली आणि महापालिकेची निवडणूक लढवून निवडून आलो.

* प्रकल्प व्यवस्थापनाच्या पद्धती आणि तंत्र यात जर्मनीतला डिप्लोमा मिळविणारे तुम्ही, व्यवसाय व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी मिळविणारे तुम्ही, असे शिक्षण जेव्हा महाविद्यालयीन जीवनात घेतले जाते, तेव्हा एक तर परदेशात स्थायिक होणे किंवा कॉर्पोरेट जगतामध्ये वरिष्ठ पदावर काम करणे असे मुले किंवा त्यांच्या पालकांच्या मनात असते, तुमच्याही मनात असेच होते?

– मी विधि शाखेचा (लॉ) पदवीधर होण्यापूर्वी निवडून आलो. त्यामुळे माझी दिशा ठरली होती. आतापर्यंत इच्छा असूनही जे करू शकलो नाही, ते म्हणजे मला इंग्लंडमध्ये जाऊन कायद्यातील उच्चशिक्षण घ्यायचे होते. पण ते शक्य झाले नाही. मात्र निवडून आल्यानंतरही अनेक विषयांच्या परीक्षा दिल्या आणि अध्र्यावरही सोडल्या. बी.कॉम., एम.ए.च्या परीक्षा दिल्या, मात्र त्या अध्र्यावरच राहिल्या. जर्मनीत व्यवस्थापनाची पदवी मिळाली त्याचा किस्साही रंजक आहे. जर्मन सरकारचे काही प्रकल्प चालतात. तेथील सरकार जगभरातून काही मुलांची निवड करतात आणि त्यांना काही महिने शिक्षण देतात. त्या वेळी या अभ्यासक्रमासाठी त्यांनी मला का निवडले माहीत नाही, कारण त्या वेळी माझ्यासोबत असणारी अन्य मंडळी उच्चशिक्षित- प्रशासकीय अधिकारी होते. केवळ मीच राजकारणातील होतो. माझ्या निवडीबद्दल त्यांना जेव्हा विचारले तेव्हा, तुमच्यात राजकीय क्षेत्रात पुढे जाण्याची क्षमता आम्हाला दिसते असे त्यांनी सांगितले.

* सवरेत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार आपण मिळविलात. गेली तीन वर्षे राज्याच्या विधिमंडळाच्या सभागृहात अगदी जहरी टीकेलाही आपण संयमाने उत्तर देण्याचे भान ठेवले. भाषणात, सभागृहाच्या कामकाजात तुमच्या वक्तृत्वाची झलक अगदी विरोधकांनाही दिसते. हे वक्तृत्व अंगभूत आहे की विकसित केलं आहे?

– राज्याचा प्रमुख झाल्यापासून मी संयमी झालोय असं म्हटलं जातं. पण ते कौशल्य मला आत्मसात करावं लागलं. आक्रमकपणे समोरच्यांच्या अंगावर जाणं हे मी विरोधी पक्षात असताना शिकलो. त्यामुळे मुख्यमंत्री झाल्यावरही सुरुवातीच्या काळात विरोधकामधील कोणी बोललं की आक्रमकपणे हल्ला करीत असे. काही जणांनी समजावलं.. मुख्यमंत्र्यास हे शोभत नाही म्हणून. त्यानंतर एका अधिवेशनात माझ्या आसनावर बसलो की स्वत:लाच समजवायचो, आपण मुख्यमंत्री आहोत, शांत बसायचं, स्वत:वर संयम ठेवायचा. हे असं संपूर्ण अधिवेशनात ठरवून शांत, संयमी राहिलो. आता मात्र हेही तंत्र आत्मसात झालंय.

* विरोधी पक्षांच्या लोकांपेक्षा पक्षांतर्गत विरोधकांचा त्रास तुम्हाला जास्त होतोय का?

– खरं सांगतो. त्रास वगैरे बिलकूल नाही. हे सगळं कपोलकल्पित असतं. पक्षातही आपल्या परिवारासारखीच मतमतांतरे असतात. पण टोकाचा विरोध कधी नाही झाला.

* आपल्याच पक्षातील अन्य मुख्यमंत्र्यांशी तुमची तुलना होते, तेव्हा तुम्ही वाजवीपेक्षा जास्त सहिष्णू आहात असे बोलले जाते.

– माझी राजकीय-सामाजिक क्षेत्रातील वाटचालीची पाश्र्वभूमी पाहिल्यास माझे वडीलही याच क्षेत्रात होते. सर्वाशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. केवळ पक्षातीलच नव्हे तर विरोधकांशीही पारदर्शक, सर्वसमावेशक संबंध होते. आपल्यातही हे सर्व गुण उपजत आहेत. हे काही आत्मसात किंवा तयार करावे लागले नाहीत. माणसं आली की त्यांच्याशी मैत्री होणं हे माझ्या मूळ स्वभावात आहे. व्यक्तिगत सहिष्णुतेबाबत विचार करायचा झाल्यास देशाच्या संपूर्ण राजकरणात अटलजींपेक्षा मोठे उदाहरण असूच शकत नाही. अटलजींकडे पाहिल्यानंतर, एक व्यक्ती किती संयमी, सहिष्णू असू शकते, आपल्या विरोधकांचाही उल्लेख करताना किती आदराने करता येतो, हे अटलजींनी आम्हाला शिकविले.

* अटलजींचा विषय निघाला म्हणून विचारतो, तुम्ही स्वत: भारावून जाऊन ऐकलाय असा वक्ता कोण?

– असे अनेक वक्ते आहेत. पण मला विशेषत्वाने उल्लेख करावा असा वाटतो तो म्हणजे एक अटलजींचा आणि दुसरा प्रमोदजींचा.

* विधिमंडळाच्या सभागृहात बसलेले असताना विरोधी पक्षातील कोणत्या नेत्याबद्दल विशेष आस्था वाटते?

– या सभागृहात नावं घेण्यासारखे अनेक नेते आहेत. पण एका व्यक्तीचा मी आदरपूर्वक उल्लेख करू इच्छितो, ते म्हणजे गणपतराव देशमुखांचा. आज वय वर्षे नव्वदीतही ते अस्खलित भाषणे करतात. विषयाच्या खोलात जाऊन पण सामान्यांना समजेल असं त्यांचं भाषण असतं. विदर्भातून आल्याने मी सभागृहात सातत्याने विदर्भाचे प्रश्न मांडायचो. पण दुष्काळी भागातील विषय काय, महाराष्ट्रातील दुष्काळ म्हणजे काय, महाराष्ट्रातील प्रश्न काय आहेत हे जर शिकायचे असेल तर एकच पर्याय, गणपतरावांच्या भाषणाला पूर्ण वेळ उपस्थित राहायचे.

* आपण अनेकदा पहाटे मेसेज करता असे पत्रकार मित्र सांगतात, तर तुम्ही जागे किती वाजेपर्यंत असता?

माझा एक नियम असा आहे की, रात्री सर्व काम झाल्यावर झोपायला गेल्यावर जेवढे मेसेज असतील त्यांना उत्तर द्यायचं. झोपायला दररोज साधारणत: दोन ते तीन वाजतातच. सरासरी चार तास झोप होते.

* पक्षांतर्गत विरोधकांना समजावण्यासाठी संयम, कडक अंमलबाजावणी की उत्तम केलेला संवाद उपयोगी पडतो?

– मला असं वाटतं की संवाद आणि संयम या दोन गोष्टी ज्याला आपण राजकारणातील मूल्य म्हणतो त्या महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे ज्याला संयम आहे त्याला संवाद करता येतो आणि तो कुठल्याही परिस्थितीतून मार्ग काढतो. माझं तर मत असं आहे की राजकारणातील माणसाने कासवासारखे असावे. जेव्हा दगड पडतात तेव्हा आतमध्ये जावे आणि दगड बंद झाल्यानंतर मार्गक्रमण करावे.

* मोदीसाहेब पहिल्यांदा कधी भेटले?

– १९९८ साली मोदीसाहेबांशी पहिली भेट झाली. नागपूरला युवा मोर्चाचा अभ्यासवर्ग होता. त्या वेळी मार्गदर्शनासाठी ते आले होते. मीच आयोजक असल्याने त्यांच्याशी संवाद साधता आला. या पहिल्या भेटीत त्यांच्यातील जाणवलेलं व्यक्तित्व म्हणजे, ‘आपल्यातला माणूस’! कोणताही बडेजाव नाही. साधी राहणी आणि आक्रमक विचार.

* मुख्यमंत्रिपद यशस्वीपणे गाजविल्यानंतर  कधीतरी पंतप्रधानपद चालून येईल असं जरा तरी वाटतं का?

– या देशातला एक इतिहास आहे. ज्यांनी ज्यांनी पंतप्रधान होण्याचं स्वप्न पाहिलं तो कधीच झाला नाही. आणि महाराष्ट्राचा तर इतिहासच आहे. महाराष्ट्रात ज्यांनी ज्यांनी पंतप्रधान होण्याचं स्वप्न पाहिलं तो खाली खालीच गेला. आपलं बरं आहे, चांगलं चाललंय.

शब्दांकन : संजय बापट