निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे समर्थक आणि शिंदे गट यांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. शिंदे गटामुळे हे चिन्ह गोठवण्यात आले असल्याचे उद्धव ठाकरे समर्थकांकडून सांगण्यात येत आहे, तर चिन्ह गोठवण्याला उद्धव ठाकरे जबाबदार असल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. दरम्यान, यावरून संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी शिंदे गटावर टीका केली आहे.

हेही वाचा – संजय राऊतांना आणखी एक धक्का, पत्नी वर्षा राऊतांनाही पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीचं समन्स

काय म्हणाले सुनील राऊत?

“शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर शिंदे गटाविरोधात एक संतापाची लाटू उसळू लागली आहे. ही लाट येणाऱ्या निवडणुकीत मतपत्रिकेत उतरेल आणि शिंदे गट संपुष्टात येईल, अशा प्रकारचे वातावरण या राज्यात आहे”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी दिली आहे.

हेही वाचा – ठाकरेंना ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह परत कधी मिळणार? आगामी महानगरपालिका निवडणुकाही नव्या चिन्हावरच?

दरम्यान, धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून तीन पर्याय निवडणूक आयोगाला सुचवण्यात आले होते. यामध्ये त्रिशूळ, मशाल आणि उगवत्या सुर्याचा समावेश होता. मात्र, त्रिशूळ या चिन्हाची शिंदे गटाकडून मागणी करण्यात आली आहे. यावरून त्यांनी शिंदे गटावर टीका केली. “भाजपा नेते जे सांगतील, ते करायचे एवढंच काम सध्या शिंदे गटाकडे आहे. जी शिवसेना बाळासाहेबांनी आपल्या कष्टातून निर्माण केली. ती नष्ट करण्याचे पाप शिंदे गटाने केले आहे. त्यांना कधीही सुख लाभणार नाही”, असेही ते म्हणाले.