दलित-आदिवासींच्या अत्याचाराच्या विरोधात लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना नक्षलवादी ठरवून त्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेणाऱ्या सरकारचा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रातील बुद्धीवंतांनी निषेध केला.
विद्रोही चळवळीतील एक ज्येष्ठ कार्यकर्ते सुधीर ढवळे व अन्य आठ जणांना कसलाही पुरावा नसताना नक्षलवादी ठरवून तुरुंगात टाकणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, साहित्यिक ज.वि.पवार, आनंद पटवर्धन, श्याम सोनार, उर्मिला पवार, सुमेध जाधव, विजय कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई आदींनी शुक्रवारी संयुक्त पत्रकार परिषदेत केली.  
सुधीर ढवळे व इतरांना नक्षलवादी ठरवून पोलिसांनी तुरुंगात डांबले. गोंदिया सत्र न्यायालयाने १५ मे रोजी सर्व नऊ जणांना निर्दोष मुक्त केले. याचा अर्थ पोलिसांनी कसलाही पुरावा नसताना त्यांना नक्षलवादी ठरवून तीन वर्षे चार महिने तुरुंगात डांबले.
त्याबद्दल राज्य सरकारने संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी आंबेडकर यांनी केली. अन्यथा आम्ही हे प्रकरण उच्च न्यायालयात घेऊन जाऊ, असे त्यांनी सांगितले.
आर. आर. माफी मागणार होत़े?
ढवळे यांची सुटका करा, अशी मागणी वारंवार गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्याकडे केली होती. परंतु त्यावर न्यायालयात ढवळे निर्दोष सुटले तर आपण जाहीर माफी मागू, असे उत्तर त्यांनी दिले होते. आता गृहमंत्र्यांनी माफी मागावी, अशी मागणीकरणार नाही. फक्त त्यांच्या विधानाची त्यांना आठवण करून देत आहोत, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.