मुंबई : अहमदनगर येथे जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागातील कक्षाला लागलेल्या भीषण आगीची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला व्यथित करणारी आहे. भंडारासह राज्यातील अन्य ठिकाणी रुग्णालयात लागलेल्या आगीच्या घटनांमधून राज्य सरकारने कोणताही धडा घेतलेला दिसत नाही, अशी टीका करीत नगरमधील आगीप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

फडणवीस म्हणाले, नगरच्या घटनेचे  सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. त्यात आग छतामधून सुरू झालेली दिसते. महापालिकेकडून अग्निसुरक्षा प्रमाणपत्र (फायर सेफ्टी) रुग्णालयास मिळालेले नाही. वायरिंग दोषांबाबत विद्युत अभियंत्यानी कळविले होते.  अग्निसुरक्षा प्रणाली (हायड्रेशन आणि स्प्रिंकलर) ला आर्थिक मंजुरी देण्याचा प्रस्ताव आयुक्तांकडे काही महिन्यांपासून प्रलंबित आहे. नगर येथील सामान्य रूग्णालयाची ही दुरवस्था आहे.