बँका आणि सरकारी यंत्रणेतील समन्वयाअभावी गती मंदावली; अडीच लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांच्या माहितीत घोळ

कर्जमाफीसाठी बँकांनी पाठविलेल्या माहितीमध्ये अनेक घोळ असल्याचे निदर्शनास आले असून त्यामुळे छाननी प्रक्रियेची गती मंदावली आहे. माहिती-तंत्रज्ञान विभागाने ज्या शेतकऱ्यांना छाननीत हिरवा कंदील दाखविला, त्यांच्या नावेही वेगवेगळी खाती, चुकीचे आधार क्रमांक व अन्य त्रुटी असल्याचे निदर्शनास आले आहे. आतापर्यंत झालेल्या छाननीत सुमारे अडीच लाख शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांबाबत बँकांनी पाठविलेल्या माहितीमध्येहा घोळ असल्याने आढळून आल्याने पुन्हा तपासणी करावी लागणार आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसात छाननी प्रक्रिया व बँकांमध्ये निधी जमा करण्याच्या कामात अडचणी निर्माण झाल्या असून गतीही मंदावली आहे.

कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज मागवून छाननीही त्याच पध्दतीने केली जात आहे. मात्र बँकांनी ६६ रकान्यांमध्ये कर्जदार शेतकऱ्यांबाबत भरुन पाठविलेल्या माहितीमध्ये आधार क्रमांक, कर्जाची रक्कम आणि तो थकबाकीदार आहे किंवा नाही, या महत्वाच्या बाबींमध्येही मोठय़ा प्रमाणावर चुका असल्याचे आढळून आले आहे. त्यातच छाननी प्रक्रियेनंतर माहिती-तंत्रज्ञान विभागाने हिरवा कंदील दाखविलेल्या शेतकऱ्यांच्या यादीतही अनेक त्रुटी असून वेगवेगळ्या बँकांमध्ये खाती असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्यांच्या कर्ज खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आलेली नाही. कर्जमाफी व प्रोत्साहन योजनेसाठी सुमारे ७७ लाख २८ हजार बँक खात्यांसाठी शेतकऱ्यांनी अर्ज केले. अर्जप्रक्रिया ऑनलाईन करुनही कर्जमाफीसाठी आणि प्रोत्साहन योजनेसाठी किती अर्ज आले, याची माहिती सरकारने जाहीर केलेली नाही. मात्र याबाबत आणि किती अर्जाची छाननी पूर्ण झाली आहे, यासंदर्भात अद्याप तपशील उपलब्ध नसल्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले. कर्जमाफीसाठी घाई केल्याने बँकांवर ताण आला व त्यामुळे माहिती देण्यामध्ये काही चुका झाल्या असाव्यात. मात्र त्या दुरुस्त करुन शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जाईल आणि कोणत्याही पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवणार नाही, अशी माहिती देशमुख यांनी दिली. मात्र अजूनपर्यंत किती अर्जाची छाननी झाली आहे, याचाही तमात्र या तांत्रिक चुकांमुळे गेल्या तीन दिवसांमध्ये छाननी प्रक्रिया फारशी पुढे सरकलेली नाही. पहिल्या टप्प्यात जाहीर करण्यात आलेल्या साडे आठ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांबाबत अडचणी दूर करुन निधी जमा करणे शक्य झालेले नाही. त्यामुळे पुढील प्रक्रिया मंदावलेली आहे.

मुख्यमंत्र्यांची बँक अधिकाऱ्यांशी चर्चा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांच्या उच्चपदस्थांशी बुधवारी ‘वर्षां’ निवासस्थानी बैठक बोलावून चर्चा केली. त्यात बँकांच्या माहितीतील चुका, त्रुटी, खात्यात निधी जमा न करणे, आदी मुद्दय़ांवर चर्चा झाली. ज्या शेतकऱ्यांबाबत बिनचूक माहिती उपलब्ध आहे, त्यांच्या बँक खात्यात गुरुवारपासून रक्कम जमा करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.