मुंबई : ‘सर्वच क्षेत्रांत चढ – उतार असतात. कोणत्याही क्षेत्रांत वावरताना यश – अपयशाला सामोरे जावे लागते. त्यामुळे तुमच्यात कष्ट करण्याची तयारी हवी आणि तुम्ही आयुष्यात एकतरी छंद मनापासून जोपासलाच पाहिजे. त्यामुळे तुम्ही आयुष्यातील कोणत्याही परिस्थितीला सकारात्मकरित्या सामोरे जाता येते’, असे स्पष्ट मत मुंबईच्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी व्यक्त केले.

करिअरच्या संधींचा भविष्यवेध घेणाऱ्या ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेची सुरुवात शनिवार, २५ मे रोजी तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाने झाली. त्यानंतर ताणतणावाचे नियोजन, नव्या वाटा सत्राअंतर्गत युट्यूब/ सोशल मीडिया, वित्तक्षेत्रातील संधी, एआय – कृत्रिम बुद्धिमत्ता, विविध क्षेत्रांतील संधी, कौशल्य आणि परदेशातील उच्च शिक्षणाच्या संधी या विषयावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेच्या पहिल्याच दिवशी बहुसंख्य विद्यार्थ्यांनी पालकांसह हजेरी लावली होती.

हेही वाचा >>>मुंबई : बरे होऊनही एखाद्या व्यक्तीला रुग्णालयातच ठेवणे दुर्दैवी, उच्च न्यायालयाची टिप्पणी

‘कोणाचा आग्रह आहे म्हणून स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडू नका, तुम्हाला मनापासून वाटत असेल तरच तुम्ही स्पर्धा परीक्षेकडे वळा. स्पर्धा परीक्षा करताना आपण कुठे थांबायचे, हे समजणे आवश्यक आहे. तसेच वेळेत ‘प्लॅन – बी’कडे वळणे आवश्यक आहे. कारण स्पर्धा परीक्षेव्यतिरिक्त असणाऱ्या क्षेत्रांमध्येही काळानुसार बदल व प्रगती झालेली असते. परंतु स्पर्धा परीक्षेसाठी केलेला अभ्यासाचा फायदा हा तुमच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आणि कोणत्याही क्षेत्रांत काम करताना, वेळोवेळी नक्कीच होणार आहे’, असेही तेजस्वी सातपुते म्हणाल्या.