लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : एखादी व्यक्ती पूर्णत: बरी होऊनही तिला रुग्णालयातच ठेवणे अत्यंत दुर्दैवी बाब असल्याची टिप्पणी उच्च न्यायालयाने केली. ठाणेस्थित मनोरुग्णालयात दाखल महिलेच्या बहिणीने दाखल केलेल्या याचिकेच्या निमित्ताने न्यायालयाने ही टिप्पणी केली. तसेच, पतीच्या अनुपस्थितीमुळे ही महिला मनोरुग्णालयातच दाखल असल्याने तिला घरी सोडण्याची प्रक्रिया पूर्ण करता यावी यासाठी पतीला रुग्णालयात उपस्थित राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्याचवेळी, सुश्रुषा करण्यासाठी या महिलेला आपल्यासह नेण्याची परवानगी न्यायालयाने याचिकाकर्तीला दिली.

आपली बहीण एकदम ठणठणीत असून तिला चुकीच्या पद्धतीने मनोरूग्णालयात दाखल करण्यात आल्याचा दावा करून याचिकाकर्तीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच, बहिणीला न्यायालयात उपस्थित करण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती. बहिणीला आपल्यासह नेऊ देण्याची मागणीही याचिकाकर्तीने केली होती. न्यायमूर्ती नितीन बोरकर आणि न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली. त्यावेळी, न्यायालयाने उपरोक्त टिप्पणी करून महिलेच्या पतीला रुग्णालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले व याचिकाकर्तीली तिला आपल्यासह नेण्यास परवानगी दिली.

आणखी वाचा-पदवी अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू, १० जूनपर्यंत प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणी

याचिकाकर्तीची बहीण बरी झाली असून तिला घरी सोडण्याबाबतचे पत्र रुग्णालय प्रशासनाने दिले आहे. परंतु, रुग्णालयात दाखल करणाऱ्या व्यक्तीच्या उपस्थितीतच महिलेला घरी सोडले जाईल, असे सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांनी न्यायालयाला सांगितले. त्याची दखल घेऊन न्यायालयाने महिलेला घरी सोडते वेळी तिच्या पतीला रुग्णालयात उपस्थित राहावे, असे आदेश दिले. तसेच, पोलिसांनीही या सगळ्या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. रुग्णालय प्रशासनाने महिलेच्या सध्याच्या मानसिक स्थितीबाबत पती आणि बहिणीला माहिती द्यावी व तिची काळजी घेण्याबाबतच्या सूचना करावी, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.

आणखी वाचा-अंधेरीत २९, ३० मे रोजी पाणीपुरवठा बंद, काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा

याचिकेनुसार, महिलेचे २००९ मध्ये लग्न झाले. सर्व सुरळीत असताना पतीने तिला त्रास देण्यास सुरूवात केली. महिलेने ऑक्टोबर २०२२ मध्ये पती आणि आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात पोलिसांत तक्रार केली. आपण ५ मे रोजी बहिणीची भेट घेतली तेव्हा ती पूर्णपणे बरी होती. परंतु, ९ मे रोजी तिला मनोरुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे आपल्याला समजले. त्यामुळे, दुसऱ्या दिवशी रुग्णालयात तिला भेटण्यासाठी गेलो. मात्र, रुग्णालयाचा धोरणाचा भाग म्हणून आपल्याला भेट नाकारण्यात आली. आपण या प्रकरणी स्थानिक पोलिसांसह माहीम पोलिसांकडेही मदत मागितली. त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर, बहिणीची १५ मे रोजी अखेर भेट झाली. त्यावेळी, तिची अवस्था पाहून धक्का बसला. तेरा वर्षांच्या गतिमंद मुलाची वैद्यकीय चाचणी करण्याची सबब पुढे करून पतीने बहिणीला मनोरुग्णालयात नेऊन दाखल केले. ती पूर्ण बरी असताना आणि रुग्णालयानेही तिला घरी सोडण्याची तयारी दाखवली असताना केवळ पतीच्या अनुपस्थितीमुळे तिला घरी सोडले जात नाही. त्यामुळे, बहिणीच्या पतीला रुग्णालयात उपस्थित राहण्याचे आदेश द्यावेत आणि बहिणीला सुश्रुषा करण्यासाठी आपल्यासह नेण्याची परवानगी देण्याच्या मागणीसाठी याचिका केल्याचे याचिकाकर्तीने म्हटले.