कर्जतहून मुंबईकडे येणाऱ्या लोकलमधून तिघे जण पडल्याची घटना रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास बदलापूर स्थानकाजवळ घडली. यापैकी एकाचा मृत्यू झाला, तर दोघा जखमींवर उपचार सुरू आहेत. रविवारचा मेगाब्लॉक आणि बदलापूरजवळच लोकल घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक बिघडले. त्यामुळे गाडय़ांना झालेल्या गर्दीमुळेच हे तिघे पडल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे.

अजित दामनसे (वय ३५, रा. अंबरनाथ) असे मृत व्यक्तीचे नाव असून संदीप जयस्वाल (२१, भांडूप) आणि सुनील धारवे (३८, गोरेगाव) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर बदलापूरच्या धन्वंतरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  रेल्वेच्या गोंधळामुळे कर्जतहून सायंकाळी मुंबईकडे निघालेल्या लोकलला प्रचंड गर्दी होती. ही गाडी बदलापूर स्थानकाजवळ आल्यानंतर उतरण्यासाठी झालेल्या धक्काबुक्कीतून हे तिघे खाली पडले असावेत, असा अंदाज आहे.

लोकल घसरल्याने मेगाब्लॉकमध्ये भर

रविवारच्या मेगाब्लॉकमुळे आधीच मध्य रेल्वेची वाहतूक रखडत सुरू असताना दुपारी सव्वा दोनच्या सुमारास कर्जतहून बदलापूरला येणाऱ्या गाडीचा पहिला डबा रूळावरून घसरला. या अपघातात जीवितहानी झाली नाही. मात्र, मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली. मेगाब्लॉकमुळे आधीच उशिराने धावणाऱ्या गाडय़ा या अपघातामुळे आणखी १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. त्यामुळे मध्य रेल्वेच्या स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली होती.