राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात वर्षांनुवर्षे मोक्याच्या ठिकाणी ठाण मांडून बसणाऱ्या तसेच बदली न झालेल्या सुमारे शंभर कर्मचाऱ्यांची माहिती महासंचालक चंद्रशेखर ओक यांनी एका झटक्यात बदली केली असून बदलीच्या ठिकाणी तात्काळ रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. बदली रद्द करण्यासाठी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे कोणत्याही कर्मचाऱ्याने दबाव आणल्यास त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असेही याबाबतच्या आदेशात त्यांनी नमूद केले आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात वर्षांनुवर्षे अधीक्षक, वृत्तचित्र शाखा, आस्थापना, साहाय्यक अधीक्षक, वरिष्ठ लिपिक, जाहिरात विभाग, दूरमुद्रणचालक तसेच टंकलेखक, भांडारशाखा, लेखा तसेच ग्रंथालयात काम करणारे वर्ग तीन व चारच्या एकूण ९७ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश ओक यांनी जारी केले आहेत. यातील बहुतेक कर्मचारी हे अनेक वर्षे एकाच जागेवर काम करत होते तर अनेक जण पदोन्नती घेऊनही आपल्याकडील कामाचे स्वरूप सोडत नसत. यासंदर्भात अनेक तक्रारी महासंचालकांकडे आल्या होत्या. यातील काही कर्मचाऱ्यांनी पैसे घेऊन पत्रकारांना अनुभवाचे प्रमाणपत्र दिल्याच्याही तक्रारी असल्याचे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. आताही बदल्याबाबत सुस्पष्ट आदेश काढल्यानंतर यातील अनेक कर्मचारी आमदार व काही मंत्र्यांच्या माध्यमातून बदल्या रद्द करण्यासाठी दबाव आणत असल्याचे सूत्रांनी सांगितले. माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांच्या स्वाक्षरीने हे आदेश जारी झाले आहेत. याबाबत चंद्रशेखर ओक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.