कंगनाची मागणी फेटाळली

मुंबई : खटल्याची पारदर्शी सुनावणी होत नसल्याचे सिद्ध झाल्यासच त्याची सुनावणी अन्यत्र वर्ग केली जाऊ शकते. निव्वळ आरोपांच्या आधारे खटल्याची सुनावणी अन्यत्र वर्ग केली जाऊ शकत नाही, असे नोंदवून अभिनेत्री कंगना राणावत विरोधात प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या बदनामीच्या फौजदारी तक्रारीची सुनावणी अन्यत्र वर्ग करण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली.

अंधेरी येथील महानगरदंडाधिकाऱ्यांवर विश्वास नसल्याचा आरोप करून कंगनाने अख्तर यांची तक्रार अन्यत्र वर्ग मागणी केली होती. मात्र केवळ भीतीच्या आधारे खटला दुसरीकडे वर्ग करता येऊ शकत नाही. आपली भीती वाजवी आहे हे दाखवण्यासाठी कंगनाने कोणतेही ठोस आणि सकारात्मक कारण दिलेले नाही. त्यामुळेच खोट्या आरोपाच्या आधारे प्रकरण हस्तांतरित करण्याचे आदेश दिले तर संबंधित न्यायाधीशांच्या मनोबलावर परिणाम होईल, असेही अतिरिक्त मुख्य महानगरदंडाधिकारी एस. टी. दंडे यांनी कंगनाची मागणी फेटाळताना स्पष्ट केले.